 सापळा पिके 
कीडनाशकांचा अनियंत्रित वापर मानव व पर्यावरणाला धोकादायक ठरत आहे. अशा वेळी एकात्मिक कीड नियंत्रण व्यवस्थापनाचा अवलंब आजच्या काळात महत्त्वाचा झाला आहे. या पद्धतीतील अनेक घटकांपैकी सापळा पीक हा महत्त्वाचा घटक असून, त्यांचा वापर करणे हिताचे राहील.
सापळा पीक म्हणजे काय?
मुख्य पिकाचे किडींपासून नुकसान कमी करण्याच्या दृष्टीने किडींना जास्त बळी पडणारे दुसरे पीक मुख्य पिकासोबत लावले जाते, त्यामुळे त्या पिकाकडे कीड आकर्षित होते आणि पर्यायाने मुख्य पिकाचे संरक्षण होते.

सापळा पीक वापरण्याची तत्त्व :
1. सापळा पीक किडींना आकर्षित करणारे असावे.
2. मुख्य पिकाच्या शेतातील कालावधीत सुरवातीपासून ते अखेरपर्यंत किडींना आकर्षित करणारे असावे.
3. सापळा पिकावरील किडींचे अंडीपुंज व किडी गोळा करून नष्ट करावे.
4. सापळा पिकावरील किडींची संख्या खूप वाढल्यास ते उपटून टाकावे किंवा कीटकनाशकाची फवारणी करावी.
विविध पिकांतील सापळा पिके
1) कपाशीच्या प्रत्येक 10 ओळींनंतर दोन ओळी मका किंवा चवळीची पेरणी करावी.
नैसर्गिक मित्र कीटकांचे संवर्धन व अभिवृद्धी होईल. चवळीवर मावा मोठ्या प्रमाणावर येत असल्यास त्यावर जगणारे क्रायसोपा, लेडी बर्ड बिटल, सीरफिड माशी आदी मित्रकीटकांची वाढ जोराने होते. मावा शत्रू किडींची संख्या मर्यादित ठेवण्यास मदत मिळते.
2) कपाशीमध्ये 10 व्या किंवा 11 व्या ओळीत भगर पिकाची एक ओळ टाकावी.
भगरीच्या कंसातील दाणे वेचून खाण्यासाठी चिमणीसारखे पक्षी आकर्षित होतात. त्यासोबत ते पिकावरील उंटअळ्या, हेलिकोव्हर्पा, स्पोडोप्टेरा आदी किडींच्या अळ्यांना आवडीने वेचून खातात.
3) कपाशीभोवती झेंडू या सापळा पिकाची एक “बॉर्डर लाइन’ घ्यावी. सापळा पिकाचे अंतर मुख्य पिकाप्रमाणे घ्यावे. जेणेकरून आंतमशागत करताना सापळा पिकाचे नुकसान होणार नाही.
झेंडूच्या पिवळ्या फुलांकडे हिरव्या बोंड अळीचा मादी पतंग आकर्षित होऊन त्यावर अंडी घालतो. तसेच झेंडूच्या मुळांमधून सूत्रकृमींना हानिकारक “अल्फा टर्थिनील’ (Alfa-terthienyl) हे रसायन स्रवते त्यामुळे सूत्रकृमींचे नियंत्रण होण्यास मदत होते. त्यामुळे फुलांपासून जास्तीचे उत्पन्न मिळू शकते.
4) कपाशीभोवती एक ओळ एरंडी या सापळा पिकाची “बॉर्डर लाइन’ घ्यावी. एरंडीचे अंतर कपाशीप्रमाणे घ्यावे.
स्पोडोप्टेराचा व उंटअळीचा मादी पतंग एरंडीच्या मोठ्या पानावर अंडी घालतो. अशी अंडीपुंज व अळ्या वेचून नष्ट केल्यास मुख्य पिकाचे संरक्षण होते.
5) सोयाबीन पिकाभोवती एरंडी आणि सूर्यफूल या सापळा पिकाची एक-एक “बॉर्डर’ ओळ लावावी, अंतर सोयाबीन प्रमाणे 45 सें. मी. घ्यावे.
एरंडी आणि सूर्य फुलाच्या मोठ्या पानांवर स्पोडोप्टेरा, उंटअळी आणि केसाळ अळीचा कीटक अंडी घालतो. ही अंडीपुंज प्रादुर्भावग्रस्त पाने अळ्यांसहित नष्ट करावीत किंवा कीटकनाशकाची फवारणी करावी.
साहजिकच मुख्य पिकांचे संरक्षण होण्यास मदत होते.
6) तूर सलग पेरणीसाठी तुरीच्या बियाण्यात एक टक्के ज्वारी अथवा बाजरीचे बी मिसळून पेरणी करावी. अर्थात तुरीचे बियाणे 10 किलो असल्यास त्यात 100 ग्रॅम ज्वारी किंवा बाजरीचे बी मिसळून पेरणी करावी.
त्यामुळे मित्रपक्षी आकर्षित होऊन शेंगा पोखरणाऱ्या अळीचा फडशा पाडतील.
1) टोमॅटोवरील फळ पोखरणारी अळी व सूत्रकृमींच्या नियंत्रणाकरिता टोमॅटो पिकाच्या “बॉर्डर लाइन’ने मुख्य पिकाच्या अंतरानुसार झेंडूची एक ओळ सापळा पीक म्हणून लागवड करावी.
2) घाटेअळी, सूत्रकृमी यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तुरीच्या चार ओळींनंतर ज्वारीच्या दोन ओळी असे आंतरपीक घ्यावे.
7) तंबाखूच्या रोपवाटिकेसभोवताली “बॉर्डर लाइन’ने एरंडीची एक ओळ लागवड करावी.
स्पोडोप्टेराची मादी एरंडीवर समूहाने अंडी घालतो. अशी अंडीपुंज आणि अळ्या वेचून नष्ट करता कराव्यात किंवा कीटकनाशकाची फवारणी करावी.
8) भुईमूग पिकाच्या “बॉर्डर लाइन’ने सूर्यफुलाची सापळा पीक म्हणून लागवड करावी.
केसाळ अळी, स्पोडोप्टेरा व घाटेअळी या किडी सर्वप्रथम सूर्यफुलाची मोठी पाने व पिवळ्या रंगाच्या फुलांकडे आकर्षित होऊन अंडी घालतात. सूर्यफुलावरील अंडीपुंज प्रादुर्भावग्रस्त पाने अळ्यांसहित नष्ट करावीत किंवा त्यावर कीटकनाशकाची फवारणी करावी.
सापळा पिकांचे फायदे :
1. कीटकनाशकांचा वापर कमी करता येतो.
2. मित्रकीटकांचे व पक्ष्यांचे संवर्धन होते.
3. पिकाचे उत्पादन आणि प्रत सुधारता येते.
4. पीक संरक्षणाचा खर्च कमी होतो.
5. माती व  संवर्धन होते.
6. सापळा पिकापासून अधिकचे उत्पादन घेता येते. 
|| अन्नदाता सुखी भवः||
अधिक माहितीसाठी आपले फेसबूक पेज लाईक करा…
Source:
होय आम्ही शेतकरी®
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »