Heat Wave : मालेगाव, येवला, नांदगावात उष्माघाताच्या लाटेची शक्यता, आरोग्य विभाग सतर्क..
यंदा दुष्काळाचे सावट असल्याने प्रामुख्याने मालेगाव, येवला व नांदगाव या तालुक्यांमध्ये उष्माघाताची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.नाशिकच्या मालेगावमध्ये शनिवारी तापमानाने चाळीशी पार केली होती. मालेगावमध्ये ४०.६ अंश इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली होती. वाढत्या तापमानामुळे अनेक जण दुपारी घराबाहेर जाणेही टाळत आहेत. तर, नाशिक शहराचे तापमान ३६.९ अंश तर किमान तापमान ८.६ अंश नोंदवले गेले आहे. मार्च महिन्यातच नाशिक जिल्ह्याचे तापमान ३३ ते ३५ अंशांवर पोहचले आहे. यामुळे जिल्ह्यातील मालेगाव, येवला व नांदगाव या तालुक्यांमध्ये उष्माघाताची लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.उन्हाचा पार वाढत असल्याने उष्माघात होऊ नये, यासाठी आरोग्य विभाग सरसावला असून जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहे. नागरिकांनो, उन्हात जाण्याचे टाळा, उष्माघाताचे काही लक्षणे दिसत असल्यास आरोग्य विभागाशी संपर्क करा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
ऊन वाढल्याने उष्माघाताची लक्षणे नागरिकांमध्ये आढळू शकतात. उन्हामध्ये मजुरीचे कामे फार वेळ करणे, शारीरिक श्रमाचे काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे, उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध आल्याने उष्माघाताचा सामना करावा लागू शकतो.ताप येणे, शरीर शुष्क होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, शरीरास घाम सुटणे, थकवा येणे, त्वचा कोरडी पडणे, अस्वस्थ वाटणे, उलटी होणे, बेशुद्ध अवस्था, मानसिक बेचैन, तहान लागणे हे लक्षणं असतात.उष्माघातापासून काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यातील ११२ आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष कार्यान्वित केले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी दिली आहे.
उष्माघातापासून बचाव कसा करावा
१२ ते ३ या दरम्यान उन्हाची तीव्रता जास्त असते. त्यामुळे या काळात घराबाहेर पडणे टाळावे. जर घराबाहेर पडायचे असेलच तर छत्री घेऊन किंवा टोपी घालूनच घराबाहेर पडावे. तसेच, सनस्क्रीन अगदी न विसरता लावा. पाणी भरपूर प्या तसेच, कलिंगड, नारळपाणी अशी नैसर्गिक शीतपेये प्या. सौम्य रंगाचे व कॉटनचे कपडे वापरा. यामुळे ऊन खूप कमी लागते. वृद्ध व लहान मुलांना यावेळी बाहेर पाठवू नका.
उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास पाणी भरपूर प्या. गरमीच्या वातावरणातून थोडं दूर जा. एका ठिकाणी शांत बसून राहा किंवा झोपून राहा.