उन्हाळ्यात माठातील पाणी पिण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी!

0

उन्हाळ्यात फ्रिजमधले थंड पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे लोक माठातील किंवा मातीच्या भांड्यातील थंडगार पाणी पिणे पसंत करतात. मातीच्या माठातील पाणी नैसर्गिकरीत्या थंड होते; जे प्यायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइटची कमतरता दूर होत पचनक्रिया सुधारते. त्यामुळे माठातील पाणी आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण, ते पाणी पिण्याआधी काही गोष्टींची काळजी घेण्याची फार गरज असते; अन्यथा तुमच्या आरोग्याचे नुकसान होऊ शकते. माठातील पाणी पिताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ते जाणून घेऊ….

माठातील पाणी पिताना ‘या’ चुका करू नका

१) पाणी काढण्यासाठी हॅण्डल असलेला ग्लास वापरा

बरेचदा लोक मडक्यातील पाणी पिण्यासाठी काढून घेताना थेट ग्लास किंवा कोणत्याही भांड्याचा वापर करतात; पण असे अजिबात करू नका. कारण- जेव्हा तुम्ही हाताने ग्लास माठात बुडवता तेव्हा तुमच्या हातावरील आणि नखांमध्ये साचलेली घाण थेट पाण्याच्या संपर्कात येते. त्यामुळे पाणी दूषित होते. तेच पाणी तुम्ही प्यायल्यास आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या उदभवू शकतात. त्यामुळे माठाच्या भांड्यातून पाणी काढण्यासाठी हॅण्डल असलेला ग्लास किंवा भांडे वापरा.

२) माठात रोज ताजे पाणी भरा

अनेकदा माठा थोडा रिकामी झाला की, त्यात पुन्हा पाणी भरून ठेवले जाते; पण असे करणे टाळा. चांगले पाणी प्यायचे असेल, तर रोज माठ स्वच्छ धुऊन मग पुन्हा भरत जा. कारण- माठात पाणी ओतून अनेक दिवस ते पित राहिलात, तर त्यामध्ये जीवाणू वाढू शकतात; ज्यामुळे पोटाशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते.

३) माठाभोवती गुंडाळलेला कपडा रोज स्वच्छ धुवा

उन्हाळ्यात माठातील पाणी जास्त काळ थंड राहावे म्हणून त्याभोवती ओला कपडा गुंडाळला जातो. पण, हा कपडा दररोज स्वच्छ केला जाणे फार महत्त्वाचे आहे. तसे न केल्यास कपड्यात घाण साचून राहते; ज्यामुळे बुरशी आणि जीवाणू संसर्गासारख्या समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत तुम्ही दररोज कपडा साबणाने स्वच्छ धुतला गेला आहे का याची खात्री करा.

४) माठ उघडा ठेवू नका

माठात पाणी भरून ठेवल्यानंतर तो नीट झाकून ठेवला आहे की नाही याची खात्री करा. जेव्हा तुम्ही माठातून पाणी पिता तेव्हा तो नीट झाकून ठेवायला विसरू नका. तसे न केल्यास माठात धूळ, घाण, कीटक शिरून पाणी दूषित होऊ शकते.

५) प्रिंटेड माठ खरेदी करू नका

आजकाल बाजारामध्ये विविध प्रकारचे प्रिंटेड माठही मिळतात आणि लोकही ते आवडीने खरेदी करताना दिसतात. दिसायला आकर्षक दिसणारे हे माठ आरोग्याला मात्र हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे आतून लेप, रंग किंवा रसायन लावून, गुळगुळीत केलेले माठ खरेदी करू नका. नेहमी पारंपरिक माठच खरेदी करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »