पिके उदंड आली, विकण्याची पंचायत झाली! डाळिंब विक्री होईलकी नाही शेतकरी संभ्रमात. निर्यात द्राक्षांच्या पैशांसाठी टाळाटाळ.

0

पाटोदा.  महेश शेटे. :- दर वर्षाच्या मानाने यंदा हवामान अनुकूल असल्यामुळे शेतकऱ्यांची शेती पीके खूप चांगली पिकली.


परंतु करोना विषाणूंमुळे सर्वत्र बराच काळ लॉक डाऊन असल्यामुळे आणि सध्या लॉक डाऊन चे नियम काही अंशी शिथिल झालेले असले तरी सर्व प्रकारचे व्यापार व व्यवहार सुरळीत चालू नसल्यामुळे हे मोठ्या प्रमाणात आलेले पिके विक्री कुठे करावी हा मोठा प्रश्न तर शेतकऱ्यांसमोर उभा आहेच, त्यासोबतच विक्री केलेल्या शेतीमालाचे पैसे भेटण्यातही एक ना अनेक अडचणी येत आहेत. यंदा हवामान अनुकूल असल्यामुळे पीक तर खूप चांगल्या प्रकारे आले, परंतु शेतकऱ्यांना पिकवलेले पिक विक्री करता आले नाही. यामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकरी, कांदा उत्पादक शेतकरी, डाळिंब उत्पादक शेतकरी, टोमॅटो उत्पादक शेतकरी व भाजीपाला उत्पादक शेतकरी हे सर्वच एकाच कचाट्यात सापडले. आणि तो म्हणजे करोना विषाणूंमुळे सर्वत्र असलेले लॉक डाऊन, त्यासंबंधीचे प्रतिबंधात्मक उपाय व जनसामान्यांमध्ये असणारे समज-गैरसमज.

नाशिक जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागात रब्बी हंगामाचे हवामान अनुकूल असल्यामुळे या हंगामामध्ये जिल्ह्याच्या पूर्वेकडील अर्थात येवला तालुक्याचा पश्चिमेकडील काही भाग व निफाड तालुक्याच्या पूर्वेकडील भागात डाळिंबाचा बहार घेतला जातो. हवामान अनुकूल असल्यामुळे यंदा या रब्बी हंगामातील डाळिंब उत्पादन तर खूप मोठ्या प्रमाणात आले परंतु दीड-दोन महिन्यावर विक्रीसाठी येणारे डाळिंब विक्रीसाठी बाजारपेठा पूर्णपणे खुल्या होतील की नाही, डाळिंबाची पूर्णपणे विक्री होईल की नाही, हा मोठा प्रश्न डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. ज्या डाळींबाच्या झाडावरती दरवर्षी दीड ते दोन कॅरेट डाळिंब निघत होते, त्या झाडांवरती या वर्षी तीन ते चार कॅरेट डाळिंब निघतील हे पूर्वानुमान शेतकरी सांगत आहेत. परंतु इतक्या उदंडतेने आलेले हे पीक विक्री करण्यासाठी जर बाजारपेठच करोनामुळे पूर्ण क्षमतेने सुरू झाली नाही, निर्यात सुरू झाली नाही तर हा डाळिंब विकायच्या कुठे हा मोठा प्रश्न डाळींब उत्पादक शेतकर्‍यांसमोर आवासून उभा आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत असून, नैराश्याच्या गर्तेत सापडला आहे. कारण सर्वसाधारणपणे एक एकर डाळिंब शेतीसाठी वार्षिक खर्च दीड ते दोन लाख रुपये येतो. आणि सर्वसाधारण दराने डाळिंबाची विक्री झाल्यास 3 लाख रुपयांच्या जवळपास शेतकऱ्यांना उत्पन्न भेटते. परंतु यंदा मात्र पीक उत्तम आल्यामुळे चार ते साडेचार लाख रुपयांच्या जवळपास उत्पन्न होईल असा शेतकऱ्यांचा सर्वसाधारण अंदाज आहे. परंतु बाजारपेठच चालू झाली नाही व निर्यात बंद राहिली तर खर्चही भरून निघेल की नाही हा पेच शेतकर्‍यांसमोर आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला एक वेळ द्राक्षाचे बेदाणे तयार करता येतात, परंतु डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांनी डाळींबाच करायचं काय ही समस्या डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांसमोर आहे. सोबतच रेल्वे बंद असल्यामुळे रेल्वे मध्ये होणारे डाळिंबाचे किरकोळ विक्री, बहुतांशी सॉस व क्याचो बनवणारे प्रोसेसिंग युनिट बंद असल्यामुळे त्यासाठी होणारी डाळिंबाची खरेदी ही बंद आहे. त्यामुळे हा हि माल पडून राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्या वरती मोठी नामुष्की ओढवली आहे. त्यामुळे शासनाने पुरेशा खबरदारीच्या उपाययोजनांसह डाळिंब निर्यात व डाळिंब विक्रीसाठी, विक्री व्यवस्थापन प्रणाली आतापासूनच विकसित करावी असे मत डाळींब उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत.

द्राक्ष उत्पादक शेतकरी व इतर भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची ही परिस्थिती यापेक्षा काही वेगळे नाही. येवल्याचा पूर्वेकडील भागातील व लागून असलेल्या लासलगाव निफाड भागातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी फेब्रुवारी, एप्रिल व मार्च या महिन्यांमध्ये निर्यात केलेले द्राक्ष खूप कमी भावाने विक्री करावे लागले. परंतु कमी भावाने विक्री करूनही अवाढव्य खर्च केलेल्या या द्राक्षांचे पेमेंट अजून भेटलेले नाही. नुकतेच या मध्यस्ती कंपनीने 30 टक्के पेमेंट कट करुन केवळ 70 टक्के पेमेंट देऊ शकतो असं सांगितल्यामुळे शेतकरी अजूनच हवालदिल झाला आहे. त्याविरोधात शेतकऱ्यांनी व द्राक्ष बागायतदार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे व कृषी अधिकार्‍यांकडे दाद मागून आठ-दहा दिवस उलटले, परंतु अद्यापही कोणताही सकारात्मक निर्णय झालेला नाही. या शेतकऱ्यांना लाख रुपये खर्च करून पिकलेले द्राक्ष मातीमोल भावाने विकावे लागले, एवढे सहन करून आता पुन्हा विक्री केलेल्या द्राक्षाचा पैसा केवळ 70 टक्के भेटणार म्हटल्यावरती शेतकऱ्यांना स्वतःच्या थोबाडीत मारून घेण्याची वेळ आली आहे. काही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा द्राक्ष निर्यातीस अनुकूल नसल्यामुळे त्यांनी बेदाणा तयार केला परंतु हा बेदाना विक्री कुठे करावा हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला आहे. दरवर्षी 140 ते 180 रुपये किलो विक्री होणारा बेदाना, या वर्षी 80 ते 100 रुपये किलोने विक्री करावा लागत आहे. त्यामुळे कोणत्याही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात पिकलेला द्राक्ष विकताना व विकल्यानंतर दरवर्षीप्रमाणे नफा तर प्राप्त झालाच नाही, परंतु केलेला खर्चही भरून निघाला नाही.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा पिकवला, परंतु नेमका गावठी कांदा विक्रीच्यावेळेस करोनामुळे बहुतांशी बाजारपेठा बंद झाल्या व विपणन प्रणालीही बंद झाली त्यामुळे कांद्याचे भाव घसरले. काही शेतकऱ्यांनी कांदा विक्री केला काही शेतकऱ्यांनी कांदा पाठवला परंतु अजूनही करोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नसल्यामुळे बाजारपेठा नियमित सुरळीत चालू नाहीत. सोबतच विपणन व्यवस्था सुरळीत नाही. त्यामुळे कांद्याचे भाव पाहिजे तसे पुरते सुधारले नाहीत. त्यातच चाळीत साठवलेला कांदा किती दिवस टिकेल हा मोठा प्रश्न आहे. कारण यंदा गावठी कांदा काढण्याच्या सुरुवातीलाच काही ठिकाणी तुरळक पाऊस झाल्यामुळे ओला झालेला कांदा चाळी मध्ये सडत आहे, त्यामुळे लोक सडलेला कांदा बाहेर काढत आहे आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा कांद्याचा भाव पडत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आलेलं कांदा पीकही शेतकऱ्यांसाठी तोट्याचं ठरत आहे. हीच परिस्थिती इतर भाजीपाला उत्पादक शेतकरी व मका उत्पादक शेतकऱ्यांची आहे. करोनाच्या संकटा मुळे कोणत्याही पिकाला रास्त भाव यंदा शेतकऱ्याला मिळाला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात तरी लवकर बाजारपेठा सुरळीत सुरू झाल्या तर येणाऱ्या खरीप हंगामात पिकणारे टोमॅटो, बाजरी, मका, झेंडू यांना चांगला बाजार भेटल्यास मागील रब्बी हंगामात झालेला तोटा भरून काढणे शक्य होईल असे शेतकऱ्यांचे मत आहे. शासनाने पुरेशा खबरदारीच्या उपाययोजना सह बाजारपेठा व विपणन प्रणालीसह निर्यात सुरू करावी असा आशावाद शेतकरी वर्ग व्यक्त करत आहेत.

महेश शेटे
Krushinews.com

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »