कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)चांदवड : उर्धुळ येथे श्रीराम मंदिराच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त रामनवमी ते हनुमान जयंती या पवित्र महापर्वकाळात भव्य श्रीराम कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाच्या पूर्वतयारीचा शुभारंभ ध्वजारोहण व पत्रिका पूजन सोहळ्याने अत्यंत भक्तिमय वातावरणात करण्यात आला.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विदर्भ रत्न, रामायणाचार्य ह.भ.प. रामरावजी महाराज ढोक यांच्या श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले असून हा आध्यात्मिक सोहळा दिनांक २६ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत मोठ्या भक्तिभावाने पार पडणार आहे. या कथेच्या निमित्ताने उर्धुळ परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
ध्वजारोहण व पत्रिका पूजन कार्यक्रम परमपूज्य महंत १०८ लखनगिरीजी महाराज आणि ह.भ.प. तुकाराम महाराज परसुलकर यांच्या शुभहस्ते व पवित्र उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी समाधान गुरुजी यांनी विधिवत पूजन करून कार्यक्रमाची धार्मिक परंपरेनुसार सुरुवात केली.
याप्रसंगी बोलताना परमपूज्य महंत १०८ लखनगिरी महाराज यांनी रामकथेचे आध्यात्मिक महत्त्व विशद करताना सांगितले की, रामनवमी ते हनुमान जयंती हा काळ अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी पर्वकाल आहे. या कालावधीत श्रीराम कथेचे आयोजन होणे हे उर्धुळकरांसाठी मोठे भाग्य आहे. श्रीराम कथा ही केवळ धार्मिक नव्हे तर जीवनाला योग्य दिशा देणारी आध्यात्मिक साधना आहे.
तसेच ह.भ.प. तुकाराम महाराज परसुलकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करत श्रीराम नाम, रामकथा आणि संत परंपरेचे महत्त्व पटवून दिले. या कथेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील अनेक संतश्रेष्ठ उर्धुळ येथे येणार असून भाविकांना आध्यात्मिक चिंतनाचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या भव्य सोहळ्याच्या आयोजनासाठी उर्धुळ ग्रामस्थ तसेच श्रीराम कथा समिती अतिशय सुंदर व सुयोग्य नियोजन करत असून संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर उर्धुळ तसेच पंचक्रोशीतील तालुक्यातील सर्व भाविक भक्त, धर्मप्रेमी व परमार्थ प्रेमींनी श्रीराम कथेचे श्रवण करून आध्यात्मिक आनंदाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
