कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)तळपत्या उन्हात आदिवासी बांधवांना चप्पल-बुटांचे वाटप करण्याचा मानवधन संस्थेचा १६ वर्षांपासूनचा अविरत संकल्प
समाजाभिमुख जीवन जगताना समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून तसेच मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा या उद्देशाने सेवा कार्य करणारी मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था नाशिक संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी उन्हाळ्यात दुर्गम आदिवासी पाड्यांवर जाऊन तेथील बंधू, भगिनी व चिमुकल्यांना बूट, चप्पल तसेच खाऊ व कपड्यांचे वाटप करण्यात येते. बालपणी अनवाणी पायांनी जे अनुभवले, सोसले तसेच परिस्थितीची आठवण म्हणून गेल्या १६ वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे.
यावर्षी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिवाळी(हरसूल) या आदिवासी गावाला भेट देण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवाळीचे मुख्याध्यापक केशव गावित सर यांचे विशेष सहकार्य व मदत लाभली.
या उपक्रमा अंतर्गत ग्रामस्थांना नवीन चप्पल, बूट, टोपी, पिशव्या, खाऊ, बिस्कीट, साड्या व कपडे, कॅलेंडर, मानवधन पेपर तसेच आरोग्याबद्दल जनजागृती करण्यासाठी ब्रश, टूथपेस्ट इत्यादी साहित्यांचे वाटप करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवाळी या शाळेला मानवधन संस्थेच्या माध्यमातून कचराकुंडया भेट देण्यात आल्या. हिवाळी गावात गावित सरांनी हिवाळी स्कूल मध्ये केलेले कार्य प्रत्यक्ष बघून एका शिक्षकाकडून पाड्यावरील विद्यार्थ्यांसाठी होत असलेले हे महान कार्य अनुभवले.त्यांचे हे योगदान इतरांना खूप प्रेरणा दायी आहे.
या उपक्रमामध्ये मानवधन संस्थेतील विद्यार्थ्यांनी व पालकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. समाजातील तळागाळातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून सतत विविध उपक्रम राबविले जात असतात. “पाड्यावरील दिवाळी” हा त्याचाच एक भाग आहे.
शाळेतील मुलांमध्ये सामाजिक जाणीव, बंधुभाव व संवेदनशीलता निर्माण व्हावी यासाठी विद्यार्थ्यांना व पालकांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले. यावेळी त्यांचा प्रतिसाद उल्लेखनीय होता.
यावेळी उपस्थितांसमोर मार्गदर्शन करताना समाजातील विषमता कमी करण्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून प्रयत्न करणे आवश्यक आहे.तसेच आपल्या मुलांना चांगले शिक्षण देणे गरजेचे आहे, त्यांच्या शिक्षणासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवणे आवश्यक आहे. कारण शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. “खेड्याकडे चला… खेड्यांचा विकास हाच देशाचा विकास…” असा संदेश यावेळी दिला.
कार्यक्रमाचे नियोजन संस्था सचिव ज्योती कोल्हे यांनी केले. संस्थेतील सर्व शिक्षकवृंद व मानवसेवकांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यात योगदान देणाऱ्या सर्व मानव सेवकांचे माझ्या विद्यार्थी मित्रांचे, पालकांचे मी अतिशय मनापासून ऋण व्यक्त करतो.
जय भारत ! जय मानव!
आपला,
डॉ प्रकाश सुकदेव कोल्हे
संस्थापक
मानवधन सामाजिक शैक्षणिक संस्था नाशिक