काजी सांगवी:- उत्तम आवारे पत्रकार
📍 दिल्ली:
चांदवड – देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल दौलतराव आहेर यांनी दिल्ली येथे केंद्रीय कृषीमंत्री मा. ना. श्री. शिवराज सिंह चौहान यांची भेट घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. तसेच विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान (VB-G RAMG) संदर्भातही महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले.

महाराष्ट्रात कांदा उत्पादनात नाशिक जिल्हा अव्वल असून, प्रति क्विंटल लागवडीस सुमारे १,६०० रुपये खर्च येतो. मात्र सध्याचा बाजारभाव ५०० ते ९०० रुपये प्रति क्विंटल इतका घसरल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही भरून निघत नाही, ही गंभीर परिस्थिती डॉ. आहेर यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.

यावेळी त्यांनी कांद्याला प्रति क्विंटल ५०० रुपयांचे थेट अनुदान देण्यात यावे, तसेच निर्यात सुलभ आणि सातत्यपूर्ण राहण्यासाठी व्याज व निर्यात धोरणात आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात, अशी मागणी केली.

तसेच नव्याने सुरू करण्यात आलेल्या “VB-G RAMG” (विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान ग्रामीण) अंतर्गत कांदा पिकाचा समावेश करून लागवडीपासून कापणीपर्यंत शेतकऱ्यांना थेट लाभ मिळेल अशी तरतूद करावी, अशी विनंतीही त्यांनी केली.

या सर्व मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेऊन योग्य निर्णय करण्याचे आश्वासन दिले.

या बैठकीस भाजपा तालुका अध्यक्ष श्री. मनोज शिंदे, चांदवडचे उपनगराध्यक्ष श्री. भूषण कासलीवाल, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री. योगेश ढोमसे, अॅड. शांताराम भवर, श्री. देविदास आहेर, श्री. अनिल कोठुळे, श्री. राजू पाटील, श्री. गणेश महाले उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार डॉ. राहुल आहेर यांचा हा दिल्ली दौरा कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »