नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांदवडमध्ये उमेदवारी अर्जाची आज अभूतपूर्व भर पडली.
कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)चांदवड, ता. १७ : नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांदवडमध्ये उमेदवारी अर्जाची आज अभूतपूर्व भर पडली. अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी झालेल्या मोठ्या गर्दीमुळे प्रशासकीय कार्यालयात दिवसभर निवडणूक उत्साहाची प्रचंड लगबग पाहायला मिळाली. नगराध्यक्षपदाच्या एकाच जागेसाठी तब्बल ३६ उमेदवार, तर दहा प्रभागांमधील २० नगरसेवक पदांसाठी तब्बल २२९ अर्ज दाखल झाले असून, यंदाच्या निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
वातावरण अक्षरशः निवडणूकमय झाले होते. संपूर्ण कामकाजावर निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद कुलकर्णी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश शिनारे यांनी काटेकोर देखरेख ठेवली.
अर्जाची छाननी, प्रतिनिधींचे अर्ज माघारी प्रक्रिया आणि अंतिम यादी जाहीर होण्याकडे नागरिकांसह राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.
मोठ्या संख्येने दाखल झालेल्या अर्जामुळे अनेक प्रभागांमध्ये तिढा, बंडखोरी आणि अनपेक्षित राजकीय समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे. चांदवडसाठी अत्यंत निर्णायक ठरणाऱ्या य निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत ३६ जणांची चुरस आणि नगरसेवकपदासाठी २२९ जणांची स्पर्धा असल्याने मतदान दिवसापर्यंत राजकीय वातावरण तापलेलेच राहणार आहे.