सकल मराठा परिवारतर्फे आयोजित एकदिवसीय महारक्तदान शिबिरात ७६२ रक्त पिशवी संकलन
काजीसांगवी(उत्तम आवारे) : राज्यभरात निर्माण झालेल्या रक्तटंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य संक्रमण परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या आवाहनानुसार सकल मराठा परिवार तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात महारक्तदान उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचा एक भाग म्हणून नाशिक येथे रेडियंट हॉस्पिटल, रुंगटा बेलाविष्ठा बिल्डिंग, मुंबई नाका येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण १११ व दिंडोरी या ठिकाणी ५१ रक्तदात्यांनी रक्तदान करत समाजहिताचा दर्जेदार आदर्श ठेवला. या शिबिरासाठी डॉ. नितीन देशमुख रेडियंट हॉस्पिटल टीम यांचे मोलाचे सहकार्य लाभले, मेट्रो रक्त् केंद्र,जिल्हा रुग्णालय नाशिक रक्तपेढीचे विशेष योगदान मिळाले.या शिबिरातील आकर्षण ठरले ते माजी सैनिक श्री. रवींद्र पदाडे यांचे अनुकरणीय योगदान. त्यांनी ७४व्या वेळेस रक्तदान करून रक्तदात्यांसमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले. तसेच श्री. सतीश गुंजाळ (३१वे रक्तदान) व श्री. योगेश उगलमूगले (१५वे रक्तदान) यांनीही समाजसेवेचे आपले कार्य पुढे चालू ठेवत उपस्थितांचे लक्ष वेधले.शिबिरात अनेक दाम्पत्यांनी एकत्र येऊन रक्तदान करीत समाजात माणुसकीचा संदेश दिला. त्यात श्री. शरद बोडके – सौ. मनिषा बोडके, श्री. नंदू सोनवणे – सौ. नयना सोनवणे, श्री. रवींद्र सूर्यवंशी – सौ. योगिता सूर्यवंशी या दाम्पत्यांचा समावेश होता.विशेष म्हणजे अशपाक शेख, शेबदाक इकबाल, कैफ मोहम्मद शेख या मुस्लिम बांधवांनीही रक्तदान करून धर्मनिरपेक्ष ऐक्य आणि मानवतेचे मूल्य अधिक बळकट केले. महिलांनीही उत्साहाने सहभाग नोंदवला.काही रक्तदाते वैद्यकीय कारणास्तव रक्तदान करू शकले नसले तरी त्यांची उपस्थिती कौतुकास्पद असल्याचे सकल मराठा परिवारातर्फे सांगण्यात आले.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी सकल मराठा परिवार नाशिक टीम सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

