पाटोदा. महेश शेटे :- शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या माध्यमातून महाडीबीटी पोर्टलवर विविध योजना राबवल्या जातात. गेल्या चार महिन्यापूर्वी महाडीबीटी पोर्टल द्वारे अचानक बंपर सोडत काढण्यात आल्या. परंतु अनुदान वितरणामध्ये मात्र मोठी दिरांगाई होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
गेल्या दीड दोन वर्षापासून महाडीबीटी पोर्टल वरती कृषी सिंचन अथवा यांत्रिकीकरणाबाबतच्या सोडती काढण्यात आलेल्या नव्हत्या. त्यामुळे सोडती काढण्यात याव्यात असा सूर शेतकरी वर्गातून उमटत होता.
त्याला प्रतिसाद म्हणून शासनाने अचानक आणि महाडीबीटी पोर्टल सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात खिरापत वाटप केल्याप्रमाणे सोडती काढून अर्ज भरलेल्या सर्वांनाच सप्टेंबरच्या मध्यात अनुदान जाहीर केले. घसघशीत अनुदान मिळणार म्हटल्यावर बऱ्याच शेतकऱ्यांनी पदरमोड करून किंवा डाग-दागिने गहाण ठेवून अनुदानित वस्तूंची खरेदी केली. पर्यायी पक्क्या बिलांसाठी जीएसटी ही भरला. शासनाला यातून मोठ्या प्रमाणात कर संकलनही झाले. परंतु अनुदानाची रक्कम जमा झाल्यानंतर पुन्हा डाग-दागिने सोडवता येतील असे मनसुबे ठेवणारे शेतकरी मात्र कधी एकदाची अनुदानाची रक्कम खात्यात जमा होते याकडे आस लावून बसलेले आहेत. परंतु शासकीय यंत्रणा याबाबत कुठली हालचाल करत नसल्याचे दिसून येत आहे.
महाडीबीटी पोर्टल वरती अर्ज केल्यानंतर अनुदान प्रलंबित असणारे जवळपास 6 लाख 69 हजार 462 शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. या अनुदानापोटी शेतकऱ्यांची जवळपास 19 अब्ज 77 कोटी 31 लाख 68 हजार 938.12 रुपये रक्कम शासनाकडे रखडली असल्यामुळे बरेच शेतकरी वर्ग महाडीबीटी पोर्टल विषय नाराज आहेत, तर काही शेतकरी वर्ग लवकरच अनुदान खात्यात जमा होईल या आशेवरती हात उसने घेऊन किंवा डाग-दागिने गहाण ठेवून वस्तूंची खरेदी केल्यामुळे मेटाकुटीला आले आहेत.
अनुदान प्रलंबित असणाऱ्या शेतकऱ्यांची योजनानिहाय आकडेवारी आणि रक्कम खालील प्रमाणे.
जल सिंचन योजना 2,47,159 शेतकरी प्रलंबित रक्कम 747,58,42,508.13 रुपये
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना. 21,461 शेतकरी.
प्रलंबित रक्कम 26,95,24,757.07 रुपये
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना. 1991 शेतकरी.
प्रलंबित रक्कम 9,83,32,490.54
बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना. 2811 शेतकरी.
प्रलंबित रक्कम 19,14,35,458.67 रुपये
कृषी यांत्रिकीकरण योजना. 3,72,154 शेतकरी
प्रलंबित रक्कम 11,16,78,17,885.21 रुपये
कांदा चाळ योजना. 2044 शेतकरी
प्रलंबित रक्कम 35,73,921 रुपये
इतर समायोजित योजना. 21,842 शेतकरी
प्रलंबित रक्कम 41,60,69,951.50 रुपये
सर्व एकत्रित शेतकरी 6,69,462 प्रलंबित रक्कम 19,77,31,68,938.12