कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) चांदवड :
धार्मिक व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या चांदवड नगरीत आध्यात्मिकतेचा व मानवतेचा सुंदर संगम घडवणारी एक स्तुत्य सेवा सुरू झाली आहे. रेणुकादेवी मंदिर, चंद्रेश्वर महादेव मंदिर आणि श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर यांच्या पवित्र सानिध्यात शिवमणी प्रतिष्ठान, चांदवड (जि. नाशिक) यांच्या वतीने भाविक भक्तांसाठी दररोज मोफत पोटभर अन्नदान सेवा सुरू करण्यात आली आहे.

परमपूज्य प्रतापे शरदचंद्र दत्तात्रय महाराज यांच्या प्रेरणा व आशीर्वादाने तसेच नर्मदा काठी गुजरात येथील भालोद येथील दत्त मंदिर, श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर, चंद्रेश्वर महादेव मंदिर आणि मा. अन्नपूर्णा रेणुका माता यांच्या कृपाशिर्वादाने ही अन्नछत्र (प्रसाद सेवा) सुरू करण्यात आली आहे.

शिवमणी प्रतिष्ठानचे संस्थापक जयअंबे बाबाजी यांच्या पुढाकारातून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला असून चांदवड नगरीत देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसह गोरगरिबांना दररोज जास्तीत जास्त एक हजार भाविक भक्तांना पोटभर भोजन मिळावे, असा पवित्र संकल्प या सेवेमागे ठेवण्यात आला आहे.

“जेवढे बसते पोटात तेवढेच घ्या ताटात – माझे ताट स्वच्छ ताट” या सामाजिक व संस्कारमूल्य जपणाऱ्या संदेशातून अन्नाबद्दल आदर निर्माण करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे. शेतकऱ्यांच्या कष्टातून वर्षभर घाम गाळून पिकवलेले अन्न वाया जाऊ नये, अन्नाचे महत्त्व समाजाला समजावे आणि प्रत्येकाने आवश्यक तेवढेच अन्न ग्रहण करावे, असा जीवनमूल्यांचा संदेश बाबाजींनी या सेवेद्वारे समाजासमोर ठेवला आहे.

नाशिक जिल्ह्यात अनेक धार्मिक स्थळे असली तरी सर्वसामान्य भाविकांसाठी अशा प्रकारची नियमित अन्नछत्र सेवा क्वचितच आढळते. मात्र आई रेणुका देवी, श्री इच्छापूर्ती गणपती बाप्पा आणि भगवान महादेव यांच्या आशीर्वादाने चांदवडसारख्या त्रिवेणी संगम साधत धार्मिक नगरीत ही सेवा सुरू झाल्याने भाविकांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

धार्मिक परंपरा, मानवतेची भावना आणि अन्नदानाचे श्रेष्ठत्व जपत सुरू करण्यात आलेली ही सेवा समाजासाठी प्रेरणादायी ठरणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा तसेच अन्नदानाच्या या पवित्र कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जयअंबे बाबाजी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

“अन्नदान हेच श्रेष्ठदान” या भारतीय संस्कृतीतील विचाराला साकार रूप देणारा हा उपक्रम चांदवड नगरीच्या आध्यात्मिक परंपरेत नवे अध्याय लिहिणारा ठरत आहे. यासोबतच भाविक भक्तांसाठी लवकरच भक्तनिवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याची माहितीही बाबाजींनी दिली.

(कोट- चौकट)
जयअंबे बाबाजी म्हणाले की,
“अन्नदान हे आपल्या भारतीय संस्कृतीत सर्वश्रेष्ठ दान मानले गेले आहे. चांदवड ही धार्मिक परंपरा जपणारी नगरी असून येथे येणाऱ्या भाविकांना देवदर्शनाबरोबरच पोटभर प्रसाद मिळावा, या भावनेतून शिवमणी प्रतिष्ठानच्या वतीने अन्नछत्र सेवा सुरू केली आहे. जेवढे बसते पोटात तेवढेच घ्या ताटात हा संदेश देत अन्नाचा आदर व अन्न वाचविण्याची संस्कृती समाजात रुजवणे हा आमचा उद्देश आहे. आई रेणुका देवी, श्री इच्छापूर्ती गणपती बाप्पा आणि भगवान महादेव यांच्या कृपाशिर्वादाने ही सेवा अधिक व्यापक करण्याचा संकल्प असून, भाविक भक्तांसाठी लवकरच भक्तनिवासाचीही सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.”

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »