पाटोदा. महेश शेटे. :- ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-2024’ अंतर्गत शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज मोफत असली तरी त्यापूर्वीच्या थकीत असणाऱ्या वीजबिलांवर सावकारी पद्धतीने व्याज आकारणी केली जात असल्यामुळे व्याजाचा आकडा व पर्यायाने वीज बिलाचा आकडा फुगत चाललेला आहे.
28 जून 2024 रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन विभाग यांनी विद्युत अधिनियम 2023 च्या 65 अन्वये, पावसाळी अधिवेशन 2024 मधील अर्थसंकल्पीय भाषणात मुद्दा क्र. 100 अन्वये राज्यातील 44 लाख 3 हजार शेतकऱ्यांना 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेती पंपांना पूर्णता मोफत वीज पुरवली जाईल व त्यासाठी 14 हजार 760 कोटी रुपयांचे अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. त्यानुसार 11 जुलै 2024 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत तसा शासन निर्णय ही निर्गमित करण्याचे ठरविण्यात आले. तसा शासन निर्णय 25 जुलै 2024 रोजी ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024’ काढण्यात आला. त्यानुसार 1 एप्रिल 2024 पासून तर 31 मार्च 2029 पर्यंत या योजनेला मान्यता देण्यात आली. तीन वर्षाच्या कालावधीत आढावा घेऊन पुढील योजनेचे भवितव्य सुनिश्चित करणे क्रमप्त ठरविण्यात आले असले तरी सद्यस्थितीत शेतकऱ्यांवरील विज बिल वसुलीचे व ऐन हंगामात कनेक्शन कट करण्याचे संकट टळले आहे.
पूर्वीच्या थकबाकी वर 18 टक्के व्याज आकारणी सुरूच.
परंतु मार्च 2024 पर्यंतच्या थकबाकीच्या रकमा शेतकऱ्यांच्या वीजबिलात तशाच असून या वीजबेलांवरती सावकारी पद्धतीने व्याज आकारणीही निरंतर सुरू आहे. कधी ना कधी हे वीज बिल भरावे लागणार आणि चक्रवाढ व्याज पद्धतीमुळे बिलाची रक्कम फुगत चालली आहे. त्यामुळे सुज्ञ शेतकरी वर्गा मध्ये नाराजीचे वातावरण आहे.
महावितरणच्या नियमानुसार जवळपास सर्वच थकबाकीदार ग्राहकांच्या वीजबिलावरती 1.25 टक्के विलंब आकार आकारला जातो, तर 3 महिन्यापर्यंत वीज बिल थकीत असल्यास 12 टक्के व्याजदर, 3 ते 6 महिन्यापर्यंत 15 टक्के व्याजदर व 6 महिन्याच्या पुढे 18 टक्के व्याजदर तोही चक्रवाढ पद्धतीने आकारला जातो. एक प्रकारे सर्व राष्ट्रीयकृत बँका किंवा पतसंस्थांचा व्याजदरही या सर्वांपेक्षा कमी असून महावितरणचा व्याजदर इतका अधिक का आणि कसा अशा विचारात सुज्ञ शेतकरी सद्यस्थितीत गढलेले असून सावकारी पद्धतीने ही व्याज आकारणी होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तर काही शेतकरी फक्त आपल्याला शेतीपंपना वीज फुकट आहे या भ्रमात असून वीजबिला पेक्षा अधिक दराने वाढत जाणारी व्याजाची रक्कम त्यांच्या अद्याप पर्यंत लक्षातच आलेली नाही. त्यामुळे ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना – 2024’ चा कालावधी समाप्त झाल्यानंतर अचानक वसुलीचा फर्मान निघेल तेव्हा मात्र शेतकरी बेजार झाल्याशिवाय राहणार नाही.