जयेश साबळे, नाशिक: नाशिकमध्ये एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार आणि धार्मिक भावना दुखावल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात 8 पीडित महिलांनी तक्रार दिली असून, यावर 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण नाशिक शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंपनीत कार्यरत असलेल्या काही पुरुष कर्मचाऱ्यांकडून महिलांचा गेल्या दोन वर्षांपासून मानसिक आणि लैंगिक छळ सुरू होता. या प्रकाराची भीषणता समजून घेतल्यानंतर पीडित महिलांनी अखेर तक्रार दाखल केली. या प्रकरणाची गंभीरता ओळखून नाशिक शहर पोलीस आयुक्तांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर, पोलीस प्रशासनाने सर्व खाजगी आस्थापनांना महिलांच्या सुरक्षिततेसाठी कडक निर्देश दिले आहेत. कामाच्या ठिकाणी महिलांना कोणताही त्रास होत असल्यास त्यांनी न घाबरता पुढे यावे, असे आवाहन शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे. यासाठी अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांक 9923323311 वर मेसेज पाठवू शकतात किंवा आपत्कालीन परिस्थितीत 112 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे. तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

कोर्टात काय-काय घडलं? एकूण 8 पीडित महिलांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एका पुरुषाच्या तक्रारीवरून 1 गुन्हा दाखल करण्यात आल्याने एकूण 9 गुन्हे झाले आहेत. शब्बीर शेख, शफी शेख, रजा मेमन, आसिफ अन्सारी, शाहरुख कुरेशी, तौसीफ अत्तार यांना ताब्यात घेण्यात आले आहे. आठ दिवसांपूर्वी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.

आज दुसऱ्या गुन्ह्या संदर्भात 5 संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या प्रकरणी 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारी वकिलांनी सुनावणी दरम्यान युक्तीवाद केला की, या प्रकरणाचा आणखी तपास करणे बाकी असून, आणखी काही महिलांच्या तक्रारी पुढे येण्याची शक्यता आहे. तर आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, या सगळ्या प्रकरणाचा तपास झाला आहे. महिलांनी इतक्या महिन्यानंतर तक्रार का दाखल केल्या? अधिकची पोलीस कोठडीची गरज नाही, असे त्यांनी सांगितले.

या प्रकरणात शहर पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार विशेष SIT पथकाची स्थापना करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या अध्यक्षतेखाली या SIT ची स्थापना करण्यात आली आहे. पुढे तपासात काय-काय बाबी समोर येतात हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.


पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »