‘मन की बात’ चे भाग : प्रेरणा आणि प्रोत्साहन यावर भारतीय शेतकऱ्यांचे विविध प्रतिसाद
Ministry of Agriculture & Farmers Welfare
‘मन की बात’ चे भाग : प्रेरणा आणि प्रोत्साहन यावर भारतीय शेतकऱ्यांचे विविध प्रतिसाद
नवी दिल्ली,
आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून दरमहा पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सामान्य जनतेला संबोधित करतात आणि समकालीन विषयांवर त्यांच्याशी संवाद साधतात. हा कार्यक्रम 3 ऑक्टोबर 2014 रोजी सुरु झाला आणि तेव्हापासून 26 मार्च 2023 पर्यंत या कार्यक्रमाचे 99 भाग प्रसारित झाले.या कार्यक्रमाच्या अनेक भागांतून कृषीविषयक समस्या देखील मांडण्यात आल्या आणि तेलबिया तसेच डाळींच्या संदर्भात कृषिविषयक अभिनव संशोधने आणि विकासात्मक घडामोडी, प्रयोगशाळांच्या दरम्यान तंत्रज्ञानाची देवाणघेवाण, हवामान बदलाप्रती लवचिक कृषी पद्धती, सेंद्रिय शेती, एकात्मिक कृषी यंत्रणा दृष्टीकोन, नैसर्गिक स्त्रोतांचे जतन, मधुमक्षिका पालन, भरड धान्ये उत्पादन आणि वापर, शेतीमध्ये ड्रोनचा वापर इत्यादी साठी कृषी समुदाय तसेच इतर भागधारकांना प्रेरित करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य करण्यात आले. मन की बात कार्यक्रमाने शेतकरी आणि इतर भागधारकांवर टाकलेला प्रभाव आणि शैक्षणिक वातावरणनिर्मिती यांचे मूल्यमापन करण्यासाठी नवी दिल्ली येथील आयसीएआर अर्थात भारतीय कृषी संशोधन मंडळ आणि हैदराबाद येथील एमएएनएजीई अर्थात राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था यांनी एक अभ्यास केला.
या अभ्यासातून हाती आलेल्या निष्कर्षांनुसार, मन की बात कार्यक्रमात चर्चिल्या गेलेल्या नैसर्गिक शेती, नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन आणि एकात्मिक शेती पद्धती (वैविध्यपूर्ण शेती) या विषयांना लहान शेतकऱ्यांनी अधिक प्राधान्य दिले. मन की बात कार्यक्रमाने कृषीविषयक तसेच उद्योजकता विषयक विकासाप्रती मोठ्या प्रमाणात जागरुकता निर्माण करण्यासाठीचे माध्यम तसेच प्रेरणेचा एक अत्यंत विश्वसनीय स्त्रोत म्हणून कार्य केले. भरड धान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या अभ्यासावरून असे दिसून आले की, मन की बात कार्यक्रमातून देण्यात आलेला संदेश आणि कृषी विज्ञान केंद्रांतील तज्ञांनी त्याचा पाठपुरावा करण्यासाठी हाती घेतलेले उपक्रम यांमुळे भरड धान्यांच्या सुधारित जाती तसेच उत्पादन प्रक्रिया यांच्या स्वीकाराविषयीच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीकोनात बदल झाला आणि त्यातून कृषी-उद्योजकतेसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले. त्याचबरोबर मन की बात कार्यक्रमाने कृषी संबंधित स्टार्ट अप उद्योगांना शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणाऱ्या अभिनव उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रोत्साहन दिले. मन की बात कार्यक्रमाच्या अनेक भागांमध्ये ज्यावर भर देण्यात आला अशा डिजिटल तंत्रज्ञानाने देखील शेतकऱ्यांच्या जागरुकतेवर तसेच माहितीवर मोठा परिणाम केल्यामुळे त्यांना कृषी तंत्रज्ञानाच्या स्वीकारावर मोबाईलवर आधारित कृषी सल्ला सेवा; उत्पादनात वाढ तसेच बाजारातील माहिती उपलब्ध होणे अशा अनेक सुविधा त्यांना मिळाल्या. त्याच प्रकारे, मन की बात कार्यक्रमात कृषी क्षेत्रासाठी ड्रोन वापरावर केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले की, (अनुकूल वृत्तीच्या) शेतकऱ्यांनी ड्रोन हे शेतीच्या प्रक्रियांसाठी उपयुक्त तंत्रज्ञान असल्याचे मत व्यक्त केले आहे. मात्र बऱ्याच शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानातील गुंतागुंत समजून घेण्याबाबत चिंता व्यक्त केली.
मन की बात कार्यक्रमाने व्यापार करण्यातील सुलभता, उच्च मूल्याच्या पिकांबाबत माहितीची सहज उपलब्धता आणि शेतकऱ्यांच्या शेती प्रक्रियेतील खर्च (20-25%ने ) कमी करू शकणाऱ्या सामुहिक पद्धती यासंदर्भात शेतकरी उत्पादक संघटनांसाठी (एफपीओ), अनुकूल वातावरण निर्माण केले. मन की बात कार्यक्रमाच्या भागांतील माहितीमुळे केंद्र सरकारच्या कृषी व्यवसायाला उत्तेजन देणाऱ्या धोरणांची आणि योजनांची माहिती मिळाली असे मत एफपीओ मधील शेतकऱ्यांनी व्यक्त केले. मधुमक्षिका पालनासंदर्भातील भागावरील अभ्यासावरून असे दिसून आले की, मन की बात कार्यक्रमाच्या प्रसारणानंतर, या क्षेत्राला अधिक चालना मिळाली.संस्थात्मक माहिती तसेच साधने यांच्या अधिक उत्तम माहितीमुळे मधुमक्षिका पालकांना व्यक्तिगत पातळीवरील पालनात मिळत होते (92,947 रुपये) त्यापेक्षा गटामध्ये काम करण्यातून अधिक उत्पन्न मिळाले. (1,28,328 रुपये प्रती 50 मधुमक्षिका पेट्या) मात्र, मधुमक्षिका पालकांसमोर ‘कीटकनाशकांच्या अवशेषाच्या समस्या’ आणि ‘योग्य साठवण सुविधेचा अभाव’ या प्रमुख समस्या होत्या.किसान रेल गाड्यांची माहिती देणाऱ्या भागामुळे शेतकऱ्यांना या गाड्यांची सेवा वापरण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यांना कोणत्याही मध्यस्थाविना त्यांचा नाशिवंत कृषी उत्पादनांना कमी वेळात इष्ट ठिकाणी पोहोचवून अधिक निव्वळ नफा मिळण्याची सुनिश्चिती झाली. तसेच, मन की बात कार्यक्रमाद्वारे प्रसारित माहितीमुळे, सेंद्रिय/नैसर्गिक शेती करण्याच्या दिशेने जागरुकता आणि सकारात्मक दृष्टीकोन वाढवण्यात यश आले. शेतकऱ्यांनी सूचना दिल्या की यापुढे जर विशिष्ट समस्येवर आधारित मन की बात कार्यक्रमाचे भाग मोसमी घडामोडींच्या अनुसार प्रसारित झाले तर शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात त्यांचा अधिक प्रभाव पडेल. म्हणून निष्कर्ष असा निघतो की मन की बात कार्यक्रमाने विविध कृषिविषयक मुद्यांवर शेतकऱ्यांना प्रेरणा देण्यात आणि जागरूक करण्यात अमुल्य भूमिका निभावली आहे.