महिलांची पावसासाठी आळवणी… आणि देवाने दिला तत्काळ प्रतिसाद!
कैलास सोनवणे दिघवद वार्ताहर : आज एकादशीच्या दिवशी चांदवड तालुक्यातील विविध भागात कांदा लागवडीच्या कामात मग्न असलेल्या महिला मजुरांनी पावसासाठी देवाला आळवणी केली. दिघवद परिसरात लागवड सुरू असताना, महिलांनी अभंग गवळणी म्हणत देवाला साद घातली.
टाकळी-लासलगाव येथून आलेल्या या महिला मजुरांनी संवाद साधताना सांगितले की, विहिरींतील पाण्याची पातळी कमी झाल्याने पिकांची लागवड अडचणीत येत आहे. त्यामुळे पावसाची तेवढीच अधिक आस लागली आहे. देवाला प्रार्थना करत त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.
त्यांच्या या आळवणीला जणू देवानेही प्रतिसाद दिला. कारण महिलांची भेट झाल्यानंतर अवघ्या २०-२५ मिनिटांत पावसाने हजेरी लावली. अचानक बरसलेल्या या सरींनी शेतकरी व मजुरांच्या चेहऱ्यावर आनंद खुलला.
शेतकरी योगेश मापारी आणि संपतराव जेऊघाले यांनी सांगितले की, “विहिरीतील पाणी कमी असूनही पावसाने थोडा दिलासा दिला आहे. त्यामुळे कांदा लागवड काही प्रमाणात सुरू ठेवणे शक्य होईल.”
👉 महिला मजुरांच्या श्रद्धेची ही हाक आणि त्यानंतर कोसळलेला पाऊस हा निसर्गाशी असलेल्या त्यांच्या नात्याचा जिवंत पुरावा ठरला.