खेळ, मार्गदर्शन आणि सन्मान कार्यक्रमांनी महिलांमध्ये उत्साह…
काजीसांगवी उत्तम आवारे
चांदवड : नगरपरिषदेच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. महिलांच्या सन्मानासाठी तसेच समाजाच्या विविध क्षेत्रांत महिलांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला शहरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमात उपस्थित महिलांना सन्मानचिन्ह म्हणून आकर्षक पर्स देण्यात आल्या, तर विशेष सन्मान म्हणून पाण्याच्या बाटल्यांचे वितरण करण्यात आले. विविध खेळ व स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या महिलांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या महिलेला पैठणी साडी, द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या महिलेला गरम पाणी करण्याचा जग (केतली) आणि तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या महिलेला पाण्याची बाटली देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमामध्ये आरटीओ विभागातील महिला अधिकाऱ्यांनी वाहतूक नियम व रस्ते सुरक्षेबाबत उपस्थित महिलांना सविस्तर मार्गदर्शन केले. सुरक्षित वाहन चालविणे, हेल्मेटचा वापर, वाहतूक सिग्नलचे पालन तसेच अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत त्यांनी जनजागृती केली. यावेळी आरटीओ विभागाच्या नमिता सानप , पूजा शेवाळे , राजश्री घावटे आणि अश्विनी निकम यांनी उपस्थित राहून महिलांशी संवाद साधत महत्त्वपूर्ण माहिती दिली.
महिलांसाठी विरंगुळा आणि आनंदाचे वातावरण निर्माण व्हावे या उद्देशाने संगीत खुर्ची, “डोंगराला आग लागली पळा पळा” हा खेळ, शब्द उच्चार स्पर्धा, उखाणे सांगणे, टिकली लावणे अशा विविध मनोरंजनात्मक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत खेळांचा मनमुराद आनंद लुटत कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या व अध्यक्षस्थान म्हणून मीनाताई कोतवाल, अर्चना कासलीवाल श्री चिंतामणी शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्षा , आणि डॉ. डोशी उपस्थित होत्या. यावेळी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच आरोग्य, स्वच्छता आणि नागरी जीवनातील महिलांची भूमिका याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रसंगी महिला बालकल्याण समितीच्या सभापती सरला मिश्रीलाल अग्रवाल यांच्यासह समिती सदस्य लिलाबाई कोतवाल, अनिता बडोदे, पुनम बांगरे तसेच नगरसेविका प्रियंका राऊत, राजश्री प्रजापत, मंगला मोरे, कमल जाधव, कल्याणी कुलकर्णी, नयना वाघ, मनीषा भालेराव उपस्थित होत्या. विविध सामाजिक संस्था, संघटनांमध्ये कार्यरत महिला तसेच शहरातील विविध समाजघटकांतील महिलांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थिती लावली.
कार्यक्रमासाठी भारतीय जनता पक्षाच्या महिला पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांच्या महिला प्रतिनिधी तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांमधील विशेष सन्मानासाठी आमंत्रित महिला आणि इतरही अनेक महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांनी समाधान व्यक्त करत सर्व उपस्थित महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वैयक्तिक सहायक म्हणून नितीन फंगाळ यांनी कार्यक्रमाचे नियोजन, समन्वय व व्यवस्थापन प्रभावीपणे पार पाडत कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.अभिलाषा दायमा मॅडम यांनी प्रभावीपणे केले. महिलांच्या सन्मानाचा आणि आनंदाचा हा सोहळा चांदवड शहरात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून उपस्थित महिलांनी कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
(बॉक्स मध्ये – विशेष आकर्षण)
स्पर्धांमध्ये महिलांचा उत्स्फूर्त सहभाग..
महिला दिनानिमित्त आयोजित संगीत खुर्ची, “डोंगराला आग लागली पळा पळा”, उखाणे सांगणे, टिकली लावणे तसेच शब्द उच्चार स्पर्धा यामध्ये महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. विजेत्यांना पैठणी साडी, गरम पाणी करण्याचा जग (केतली) आणि पाण्याच्या बाटल्या देऊन सन्मानित करण्यात आले.मनसोक्त आनंद लुटला आणि एकमेकांना महिलादिनच्या शुभेछ्या दिल्या.





