Monsoon Update : मान्सून ची जोरदार वाटचाल, कोणत्या भागात वाढणार जोर?

राज्याच्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. रत्नागिरी, सिंधुदूर्ग व अन्य कोकणपट्ट्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. अरबी समुद्रात चक्री वादळााची स्थिती निर्माण झाली आहे.रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.तसेच राज्यात पावसाचे प्रमाण खानदेशात कमी असल्याचे दिसून येत आहे.
पेरणीयोग्य पाऊस कुठेही झाला नसल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.तसेच अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे, तर जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस सुरु आहे. आज राज्यात हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे मात्र अद्यापही पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी लगेच पेरणीची घाई करू नये, पुरेशी ओल आल्यावरच पेरणीचा निर्णय घ्यावा असा सल्ला कृषी विभागाच्यावतीने देण्यात आला आहे.
आज (ता.२८) महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी भागात पावसाने हजेरी लावली असून कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात आज पासून पुढचे तीन दिवस पावसाचा जोर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला आहे.मुंबई उपनगरातील बोरिवली,कांदिवली, अंधेरी भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यातही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तसेच नाशिक,हिंगोली, नंदूरबार, परभणी,जालना, नांदेड आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.