ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं निधन
(सातारा वार्ताहर ) : ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं आज, शुक्रवारी 27 ऑक्टोबर रोजी नेरुळ येथे निधन झालं. ते 89 वर्षांचे होते.
बाबा महाराज सातारकर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी साताऱ्यात झाला. त्यांचे वडील ज्ञानेश्वर महाराज सातारकर हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचं शिक्षण घेतलं. वयाच्या आठव्या वर्षांपासून बाबा महाराज श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणायचे. तिथूनच त्यांवर कीर्तनाचे संस्कार रुजत गेले. वयाच्या अकराव्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडेही घेतले आहेत.
बाबा महाराज सातारकर यांनी आपलं आयुष्य अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी अर्पण केलं. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचं प्रबोधन केलं. त्यांच्या कीर्तनाला महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्त जमत होते.
बाबा महाराज सातारकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे व्यसनमुक्ती पुरस्कार, कार्यगौरव पुरस्कार, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती टस्ट,तिसरी जागतिक मराठी परिषद नवी दिल्ली याशिवाय मुंबई, पुणे, पिंपरी, चिंचवड, सासवड, पैठण,अक्कलकोट, नागपूर, सोलापूर या नगरपालिकेतर्फे आणि महानगरपालिकांतर्फे त्यांना नागरी सत्कार देवून पुरस्कृत करण्यात आले आहे.
बाबा महाराज सातारकर यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या कीर्तन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.