महाराष्ट्रातील जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता

महाराष्ट्रातील जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता
माती परीक्षणाच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील जमिनींमध्ये 35.4 टक्के जमिनीत उपलब्ध जस्त, 25.7 टक्के जमिनीत उपलब्ध लोह व 25.7 टक्के जमिनीत उपलब्ध बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आढळून आली आहे. मात्र उपलब्ध मॅंगनीज, तांबे व मोलाब्द पुरेशा प्रमाणात पिकांना पुरविण्याची क्षमता महाराष्ट्रातील जमिनीमध्ये आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील जमिनीमध्ये एकापेक्षा अधिक सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत आहे. माती परीक्षण अहवालानुसार त्यांचा योग्य प्रमाणात वापर पीक उत्पादनाची व शेतीमालाची प्रत वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. चाळीस वर्षांपूर्वी एकाच अन्नद्रव्याची कमतरता (नत्र) जाणवत होती, आज त्याच मातीमध्ये सहा अन्नद्रव्यांची (नत्र, स्फुरद, गंधक, लोह, जस्त, बोरॉन) कमतरता दिसून येत आहे. यापुढे योग्य काळजी घेतली नाही, तर सहा अन्नद्रव्यांच्या या यादीत वाढ होईल हे निश्‍चित आहे. पिकांना लागणारी अन्नद्रव्ये आणि त्यांचे प्रमाण योग्य असेल तरच पिकांची चांगली वाढ होत असते.

सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेची कारणे
1) अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित व संकरित वाणांचा वापर.
2) भरखते/ सेंद्रिय खतांचा कमी वापर.
3) रासायनिक खतांचा असंतुलित वापर.
4) सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांचा नगण्य वापर.
5) वर्षातून सतत एकापेक्षा जास्त पिके घेणे म्हणजे बहुपीक पद्धतीचा वापर.
6) पिकांची योग्य अशी फेरपालट न करणे.
7) संयुक्त किंवा अतिशुद्ध अशा सूक्ष्म अन्नद्रव्येविरहित रासायनिक खतांचा वापर.
8) सतत बागायती पिके घेतल्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण घटणे.
9) पिकातील व जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांचा परस्पर संबंध.
10) जमिनीचे उपलब्ध सूक्ष्म अन्नद्रव्यांशी संबंधित गुणधर्म, उदा. जमिनीत पाण्याच्या निचऱ्याचा अभाव, मुक्त चुन्याचे प्रमाण, क्षारवट व चोपण जमीन, जमिनीचा सामू जास्त असणे

पत्रकार -

Translate »