Wheat Market : एफसीआयची गहू खरेदी २३ टक्क्यांनी कमी
Wheat Market : एफसीआयची गहू खरेदी २३ टक्क्यांनी कमी
पंजाब आणि हरियानात गहू काढणीने अद्याप वेग घेतला नाही. त्यामुळे लगेच काळजी करण्याचे कारण नसल्याचे सरकारच्या वतीने सांगिण्यात आले.
Wheat Rate : सरकारकडे सध्या गव्हाचा साठा (Wheat Stock) खूपच कमी आहे. त्यामुळे भारतीय अन्न महामंडळाने यंदा ३४१ लाख टन गहू खरेदीचे उद्दीष्ट ठेवले आहे. पण १६ एप्रिलपर्यंत गव्हाची खरेदी गेल्यावर्षीपेक्षा २३ टक्क्यांनी कमी आहे.
मात्र पंजाब आणि हरियानात गहू काढणीने (Wheat Harvesting) अद्याप वेग घेतला नाही. त्यामुळे लगेच काळजी करण्याचे कारण नसल्याचे सरकारच्या वतीने सांगिण्यात आले.
सरकारने १ एप्रिलपासून गहू खरेदीची प्रक्रिया सुरु केली. सरकारी संस्थांनी १६ एप्रिलपर्यंत देशात ४१ लाख ६९ हजार टन गहू खरेदी केला. तर मागीलवर्षी याच काळातील खरेदी ५४ लाख ४१ हजार टन होती. यंदा पंजाब आणि हरियानात गहू काढणीला उशीर होत आहे.
या दोन्ही राज्यांमध्ये गहू काढणीने वेग घेतल्यानंतर सरकारची खरेदीही वाढेल. तर मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात गहू खरेदीची गती गेल्यावर्षीपेक्षा कितीतरी पटीने चांगली आहे.
पंजाब फ्लोअर मिलर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष नरेश घई यांनी सांगितले की, गहू उत्पादक महत्वाच्या राज्यांमध्ये पाऊस झाला. त्यामुळे गहू काढणीला उशीर होणार आहे. सध्या शेतीतील पीक वाळत आहे. पिकातील ओलाही कमी होत असून काही भागांमध्ये पीक वाळलेही आहे. त्यामुळे पुढील काळात बाजारातील गहू आवक वाढेल.
यंदा केंद्र सरकारने ३४१ लाख ५० हजार टन गहू खरेदीचे उद्दीष्ट ठेवले आहे. यापैकी १३२ लाख टन गहू पंजाबमध्ये खरेदी केला जाणार आहे. तर हरियानात ७५ लाख टन, मध्य प्रदेशात ८० लाख टन आणि उत्तर प्रदेशात ३५ लाख टनांची खरेदी होणार आहे.
सध्या मध्य प्रदेशात २३ लाख २८ हजार टनांची खरेदी झाली. गेल्यावर्षीपेक्षा १५९ टक्के खरेदी अधिक झाली. तर उत्तर प्रदेशातील गहू खरेदी ५९ टक्क्यांनी वाढून ४२ हजार टनांवर पोचली. पंजाबमध्ये ११ लाख टन तर हरियानात ७ लाख टनांची खरेदी झाली. खरेदी केंद्रांवर आतापर्यंत ९२ लाख टन गहू आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
पंजाबमध्ये गहू काढणीने वेग घेतला नाही. पण खरेदी केंद्रांवरही आवक कमीच आहे. त्यामुळं सरकारची चिंता काहीशी वाढली आहे. पण काढणीने वेग घेतल्यानंतर आकही वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सध्या केंद्राकडे गहू आणि तांदळाचा शिल्लक साठा खूपच कमी आहे. त्यामुळे यंदा गहू खरेदीचे उद्दीष्ट वाढवले आहे. गेल्या हंगामात ४४४ लाख टन खरेदीचे उद्दीष्ट असताना केवळ १८८ लाख टनांची खरेदी होऊ शकली. तर यंदा ३४१ लाख टन खेरदीचे उद्दीष्ट आहे.
हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी केंद्रानं गहू खरेदीचे नियम शिथिल केले आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब आणि हरियानात झालेल्या पावसात पीक भीजले. त्यामुळे ओलावा अधिक असून पिकाची चमक कमी झाली. केंद्राने या नियमांमध्ये शिथिलता आणली आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏