Maharudra Mangnale : हंडरगुळी बाजारचं नातं संपलं!

बाजारात शेणा-मुताच्या मातीवर सतरंजी नाही तर एखादं पटकूर अंथरूण त्यावर डब्बे सोडून माणसं जेवतात. वर्षानुवर्षांची त्यांची ही सवय आहे.त्यांचाही नाईलाज आहे.
Animal Market Story : परवा हंडरगुळीच्या बाजारला गेलो होतो.आमच्या एक वर्षे वयाच्या देवणी खोंडाला जोडीदार खोंड घ्यायचा होता.सकाळी त्याला टेम्पो मध्ये टाकण्यापासून ते बाजारात उतरेपर्यंत त्याने आमचे बेहाल केले.
चालक संगम,आमचे शेजारचे शेतकरी मित्र मंगेश सारोळे व मी असे तिघेजण होतो.पहिल्यांदाच गोठा सोडला असल्याने,ते थांबायला तयार नव्हतं.
वयाच्या दहा-बारा वर्षांपासून मी हंडरगुळीचा जनावरांचा बाजार बघतोय.सुरूवातीला वडिलांसोबत,नंतर पत्रकार म्हणून आणि गेली बारा वर्षे म्हशीपालक म्हणून.या सुमारे ५० वर्षांत जनावरांच्या बाजारात कसल्याच सुविधा निर्माण झाल्या नाही.
अख्ख्या बाजारात जनावरांसाठी सोडा,माणसांना बसायलासुध्दा शेड नाही,एकही निवारा नाही की झाड नाही.म्हशींचा बाजार तर हागणदारीतच भरतो.जनावरांना पिण्याच्या पाण्याचा हौद नाही.तेव्हाही आणि आताही घागरीवर पाणी विकत घेऊन जनावरांना पाजावं लागतं.
तेव्हा चहा,नाष्त्याच्या जशा टपऱ्या होत्या तशाच आजही आहेत.तेव्हा जसा बेक्कार चहा मिळायचा तसाच आजही मिळतो.तेच भजे,तोच चिवडा आणि च्या.पाच-सहा राज्यातून शेकडो व्यापारी,खरेदीदार, शेतकरी इथं येतात पण एकही चांगलं हॉटेल नाही.
बाजारात शेणा-मुताच्या मातीवर सतरंजी नाही तर एखादं पटकूर अंथरूण त्यावर डब्बे सोडून माणसं जेवतात .वर्षानुवर्षांची त्यांची ही सवय आहे.त्यांचाही नाईलाज आहे.
भयंकर उन्हात फिरताना कदरून गेलो.एकदम बेक्कार मुड बनला.अशा उन्हात केवळ पाण्यावर भागत नाही.शुगर लागते.पहिला काळा चहा पिला.त्यात पत्ती नावालाच.भरपूर साखर.स्वत:ला शिव्या घालत तो चहा पिला.पुन्हा तासाभराने बाजारातील दलाल मित्राने फारच आग्रह केला म्हणून पुन्हा दुसऱ्या टपरीवर काळा चहा मागवला.
पत्ती जास्त टाका,असं सांगूनही टपरीवाल्याने तसाच चहा दिला.दोन घोट पिऊन त्याच्यासमोरचं मातीत ग्लास रिकामा करून,पैसे दिले.
माझ्या या कृतीची त्याच्या चेहऱ्यावर कसलीच प्रतिक्रिया उमटली नाही.मला हेच अपेक्षित होतं.इथली माणसं व्यवसाय करीत नाहीत.पैसे घेऊन लोकांवर उपकार करीत असतात..दलिंदर यांनाच म्हणत असावेत!
धन्यवाद
🙏🙏🙏

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »