छत्रपती संभाजीनगर ते पुणे या नव्या द्रुतगती महामार्गाच्या बांधकामासाठी २५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी पहिल्या दोन टप्प्यांनाच मंजुरी दिली. शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या २०५ किलोमीटरच्या या द्रुतगती मार्गासाठी १४ हजार ८८६ कोटी रुपये खर्च येणार आहे. हा प्रकल्प बीओटी पद्धतीने राबविण्यात येणार असून, पूर्ण झाल्यानंतर २००८ च्या पथकर धोरणानुसार वाहनांवर पथकर आकारला जाईल. या मार्गासाठी जवळपास २ हजार ६३३ हेक्टर जमीन अधिग्रहित करावी लागणार आहे. हा महामार्ग तीन टप्प्यांत उभारण्यात येणार असून, पहिले दोन टप्पे छत्रपती संभाजीनगर ते शिरूर या मार्गास समर्पित असतील. शिरूर ते पुणे हा मार्ग तिसऱ्या टप्प्यात उभारण्यात येईल. पहिल्या दोन टप्प्यांसाठी १४ हजार ८८६ कोटी तर तिसऱ्या टप्प्यासाठी सुमारे १० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र, तिसऱ्या टप्प्याच्या मंजुरीबाबत सोमवारी निर्णय घेण्यात आला नाही.

छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गाच्या बांधकामासाठी आवश्यक असलेली जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रिया गेल्या २१ महिन्यांपासून सुरू आहे. या मार्गामुळे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पीरवाडी, हिरापूर, सुंदरवाडी, झाल्टा, आडगाव बुद्रुक, चिंचोली, घारदोन आणि पैठण तालुक्यातील वरवंडी खुर्द, पारगाव, डोणगाव, बालानगर, कापूसवाडी, वडाळा, बवा, वरुडी बुद्रुक, पाचळगाव, नारायणगाव, करंजखेडा, आखतवाडा, वाघाडी, दडेगाव जहाँगीर, पोटगाव आणि सायगाव या गावांच्या शेतकऱ्यांना प्रभावित होणार आहे. या मार्गामध्ये बिडकीन येथे काही बदल करण्यात येणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गाच्या कामासाठी अधिसूचना येत्या आठवड्यात प्रसिद्ध होणार आहे. ५ सप्टेंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीत या मार्गाला पर्याय म्हणून जुन्या महामार्गाचे नूतनीकरण करण्याची चर्चा झाली होती. मात्र, त्यानंतर २३ सप्टेंबरच्या बैठकीत एक्स्प्रेस-वे प्रकल्पाचा सुधारित प्रस्ताव मंजूर करण्यात आला. जून २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने या प्रकल्पाची जबाबदारी एनएचएआय आणि राज्य सरकारला सोपवली होती. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यादेवीनगर (अहमदनगर) आणि पुणे जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि एमएसआयडीसी यांनी मिळून जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »