चला जाणून घेऊया रासायनिक शेतीची सुरवात व् दुषपरिणाम

चला जाणून घेऊया रासायनिक  शेतीची सुरवात व् दुषपरिणाम….
       जर्मन रसायनशास्त्रज्ञ जस्टस लेबिग यांनी नत्र, स्फुरद आणि पालाश (NPK) या त्रिसूत्रीचा शोध लावला.  सन 1905 मध्ये फ्रिट्‌झ हेबर या शास्त्रज्ञाने हवेतील  नायट्रोजनपासून अमोनिया वायू तयार केला.  1915 मध्ये कार्ल बॉश या शास्त्रज्ञाने कृत्रिम अमोनिया तयार केला. त्याच अमोनियाने पहिल्या महायुद्धात कैसरच्या लढाईमध्ये सुमारे आठ लाख लोकांचा बळी घेतला. युद्ध संपल्यावर मग पिकाची वाढ करण्यासाठी तो शेतकऱ्यांना पुरवायला सुरवात झाली. नंतर पुन्हा आय. जी. फ्राबेन या कंपनीने दुसऱ्या महायुद्धात लोकांना मारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अमोनियाची निर्मिती केली.
        महायुद्धाच्या शेवटी या वायूची निर्मिती करणाऱ्या अमेरिकन कंपन्यांचा हा अमोनिया, तसेच युद्धभूमीवर डास, माश्‍या, चिलटे मारण्यासाठी तयार केलेली डी.डी.टी. शेतीकडेच वळविण्यात आली. रासायनिक खतांनी रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या पिकांवर नवनवीन किडींचा प्रादुर्भाव वाढू लागला. या किडींच्या नियंत्रणासाठी क्‍लोरडेन, डेल्ड्रीन, एन्ड्रीन, पॅराथिऑन, मॅलेथिऑन यांसारख्या कीडनाशकांची निर्मिती झाली. खते, कीडनाशके, बियाणे, अवजारे, तणनाशके ही आधुनिक शेतीची तंत्रे होती. ही तंत्रे शेतकऱ्याने स्वीकारण्यासाठी अधिक उत्पादनाचे आमिष दाखविण्यात आले. सुरवातीला या तंत्राचे परिणामही तसेच होते. त्यामुळे शेतकरी ते स्वीकारू लागले. त्यासाठी शेतकरी बॅंका व या तंत्रांचे उत्पादक यांच्याकडून कर्जही स्वीकारू लागले. अनुदान, कर्जामध्ये गुंतली शेती, आधुनिक तंत्रे, अनुदान, कर्ज यांनी अमेरिकन शेतकरी, सरकार यांच्यावर जणू ताबा मिळविला. त्यानंतर कंपन्यांची दृष्टी अधिक फायद्यासाठी तिसऱ्या जगाकडे वळली. जागतिक बॅंक व अमेरिकी सरकारने ही तंत्रे स्वीकारण्यासाठी भारतावर दडपण आणले. त्यासाठी प्रचंड पैसा पुरविण्यात आला. त्याच सुमारास भारतात दुष्काळाने थैमान घातल्याने भारत सरकारने जनतेचे पोट भरण्यासाठी या सर्वांचा स्वीकार केला. अनुदान, कर्ज या आकर्षक वेष्टनांतून आलेल्या कीडनाशकांचा भारतातील वापर झपाट्याने वाढू लागला. 1966 पासून 1978 पर्यंतच्या अवघ्या 12 वर्षांत रासायनिक खतांचा वापर एक दशलक्ष टनांपासून 50 दशलक्ष टनांपर्यंत वाढला. हेक्‍टरी खतांचे प्रमाण 3.5 किलोपासून 50 किलोपर्यंत वाढले. नंतर 1950 पासून 2001-02 मध्ये हे प्रमाण 170 पटींनी वाढले. रासायनिक कीडनाशकांच्या वापराचे प्रमाण 1971 ते 1994-95 पर्यंत 100 टक्‍क्‍यांनी वाढले. या वाढत्या खर्चाबरोबर दुर्दैवाने शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनामध्ये तेवढी वाढ झाली नाही. अतिप्रमाणात वापरलेली रासायनिक खते, कीडनाशकांनी नापीक झालेली जमी न आणि शेतकऱ्यांचा अशिक्षितपणा ही मुख्य कारणे यामागे आहेत. 1977 मध्ये कर्नाटकमधील मालनाड येथे घडलेली घटना “हंडी सिंड्रोम’ या नावाने प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात भातासाठी मोठ्या प्रमाणात कीडनाशके वापरली जात. पिकावर फवारलेली कीडनाशके पाण्याबरोबर खालच्या शेतांमध्ये जात होती. या शेतांमधील खेकडे खाल्ल्याने सुमारे 200 मजुरांना पॅरालिसीस दिसून आला. खेकड्यांच्या शरीरात भातासाठी वापरलेल्या कीडनाशकांचे अंश सापडले. असे खेकडे या मजुरांनी खाल्ल्यामुळे त्यांच्यावर हा परिणाम झाला होता.
       जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमाप्रमाणे माणसाच्या शरीरात जास्तीत जास्त 1.25 पीपीएम एवढ्या प्रमाणात डी.डी.टी.चे अंश सापडले, तर फारसा त्रास होत नाही. पण दिल्लीमध्ये केलेल्या चाचणीत या शहरातील नागरिकांच्या चरबीमध्ये सुमारे 20 पीपीएम एवढे डी.डी.टी.चे अंश सापडल्याचा अहवाल “डाऊन टू अर्थ’ या मासिकात प्रसिद्ध झाला. पंजाबमध्ये हरितक्रांतीचा उच्चांक साधला गेला. आज पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यातून गंगानगर येथील कर्करोगावर उपचार करणाऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी कर्करोगाने आजारी रुग्ण रोज एक रेल्वेगाडी भरून जातात. दुर्दैवी गाडीचे नाव “कॅन्सर एक्‍स्प्रेस’ असे लोकांनी ठेवले आहे.
  हे सर्व टाळण्यासाठी गरज आहे सेंद्रिय शेतीची व् पर्यावरण सांभाळण्याची.
      

Source:
                       आपला
             दत्तात्रय ढिकले (लेखक)

पत्रकार -

Translate »