राज्यात आजपासून पाऊस सक्रिय, पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता ⛈️
मॉन्सून पुन्हा सक्रिय होऊ लागल्याने राज्यात पावसाला सुरूवात झाली आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.तसेच गुरुवारपासून पुढील दोन ते तीन दिवस बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत सर्वत्र पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली.गेल्या दोन – तीन दिवसांपासून काही ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात झाली असून राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
आज सकाळपासूनच मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे, ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे.ठाणे परिसरातही पावसाला सुरुवात झाली आहे.परभणी शहरासह जिल्ह्यातील विविध भागात दमदार हजेरी लावली.अमरावती शहरात वादळी वारा, ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा, नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार,असून राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.पुण्यासह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांनाही आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.