सोयाबीन कापणी, मळणी व साठवणूक करतांना काय काळजी घ्यावी?

सोयाबीनचे पीक सध्या काढणीच्या अवस्थेत आहे. सोयाबीन बियाण्याचे आवरण हे अत्यंत पातळ व नाजूक असते.योग्य वेळी कापणी व मळणी न केल्याने बियाण्यांची प्रत खालावण्याची शक्यता असते. सोयाबीनचे बियाणे लवकर खराब होऊ शकते व उगवणशक्तीवर परिणाम होऊ शकतो.

कापणी व मळणी :

सोयाबीनची पाने पिवळी पडून गळू लागल्यावर आणि शेंगाचा रंग भुरकट, तांबूस किंवा काळपट झाल्यानंतर पीक कापणीला आले असे समजावे. तसेच ९५% शेंगा पक्व झालेल्या असतात तेव्हा पीक कापणीयोग्य झाले असते. पीक पक्व झाल्याबरोबर कापणी सुरू करावी लागते. ओलाव्याचे प्रमाण १७% असताना या पिकाची कापणी करणे योग्य ठरते.मळणी करताना दाण्यांतील ओलाव्याचे प्रमाण १३-१५ टक्के असणे आवश्यक असते. बियाण्यामधील ओलाव्याचे प्रमाण १३ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास अशा वेळी मळणी करताना दाणे फुटून डाळ होण्याचे प्रमाण वाढते किंवा बियाण्याच्या वरच्या कवचाला तडा जाऊन उगवणशक्तीचा ऱ्हास झालेला दिसून येतो. मळणीच्या वेळी बियांमधील ओलाव्याचे प्रमाण १७ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने देखील बियाण्यास हानी पोहोचू शकते. त्यामुळे पिकाच्या कापणी व मळणीच्या वेळी बियाण्यामधील ओलाव्याचे प्रमाण १३-१५% दरम्यान असणे अत्यावश्यक असते. त्यामुळे सोयाबिनाची उगवणशक्ती टिकून राहते व गुणवत्तासुद्धा चांगली राहते.पावसाचे वातावरण असल्यास किंवा वातावरणात जास्त ओलसरपणा असल्यास सोयाबीनची कापणी टाळावी.बियाण्यात ओलाव्याचे प्रमाण जास्त असल्यास बियाणे जास्त तापमानात वाळवू नये, यामुळे उगवणक्षमता झपाट्याने कमी होऊ शकते.बियाण्यात जास्त ओलावा असेल तर बियाणे उन्हात न वाळवता सावलीत हवेशीर जागी वाळवावे.

कापणी व मळणी करण्याच्या पद्धती :

हाताने कापणी व मळणी :

सोयाबिनाचे क्षेत्र कमी प्रमाणात असेल किंवा बियाणे म्हणून उपयोगात आणावयाचे असल्यास ही पद्धत अधिक फायदेशीर ठरते. पीक कापून शेतातच ४-५ दिवस सुकवायला ठेऊन नंतर काठीने किंवा लाकडी दांड्याने ठोकून घेता येते.बियांना कमी मार लागल्यामुळे सोयाबिनाचे फारच कमी नुकसान होते. म्हणून बियाण्याची गुणवत्ता (उदा., उगवणशक्ती) टिकवून ठेवायची झाल्यास हाताने कापणी व मळणी करणे अत्यावश्यक असते.

हाताने कापणी व मळणी यंत्राद्वारे मळणी :

हाताने कापणी केलेल्या सोयाबिनामधील ओलाव्याचे प्रमाण १३-१५% असताना यंत्राने मळणी केल्यास बियाण्याची गुणवत्ता चांगली राहते.मळणी करताना मळणी यंत्रामध्ये सोयाबीन लावण्याचा वेग एकसारखा असावा, त्यामुळे बियाण्याला मार लागणार नाही.जर मळणी करताना बियाण्याची फूट होत असेल, तर थ्रेशिंग ड्रममधील काही स्टड किंवा नट कमी करावेत. तयार झालेले बियाणे ओलसर असल्यास सारखे पसरून उन्हात चांगले वाळवावे.



संयुक्त यंत्राद्वारे (कम्बाइनरद्वारे) कापणी व मळणी : कम्बाइनरद्वारे कापणी व मळणी करण्यात येते .कापून ठेवलेल्या सोयाबिनाची सुद्धा कम्बाइनरद्वारे मळणी करता येते, परंतु यात दाण्यांची डाळ होताना दिसून येते. तसेच बियांच्या कवचाला सुद्धा इजा पोहोचून त्याचा उगवणशक्तीवर परिणाम होतो. ज्या ठिकाणी सोयाबीन हे बीजोत्पादनासाठी घ्यावयाचे असेल त्या ठिकाणी कम्बाइनरद्वारे कापणी व मळणी करीत नाहीत. कम्बाइनरद्वारे कापणी व मळणी केल्यास ८-१० टक्के बियाण्याची घट होऊ शकते.

कापणी व मळणी झाल्यावर सोयाबिनाचे बियाणे उफणून, चांगले साफ करून व सुकवून साठवणे योग्य असते. जास्त ओलावा असल्यास बुरशीची वाढ होऊन बियाण्याच्या प्रतीवर परिणाम होतो. त्यासाठी साठवण करण्याआधी बियाणे उन्हात वाळविणे आवश्यक असते. दाणे खळ्यावर किंवा ताडपत्रीवर ३-४ दिवस वाळवून घेऊन, रात्री बियाणे झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी.

सोयाबीन बियाणे म्हणून तयार करावयाचे असल्यास १०-१२% ओलाव्याचे प्रमाण असलेले दाणे मशीनद्वारे वेगवेगळ्या चाळण्यांतून तसेच पृथकाद्वारे वेगळे करून पिशव्यांमध्ये साठवावे.

साठवण :

सोयाबिनाची साठवण करतांना लाकडी फळ्या टाकून त्यावर पोते ठेवावे जेणेकरून खालची ओल पिकाला लागणार नाही. पोत्याच्या चारही बाजूने हवा खेळती राहील अशा रीतीने पोते ठेवावे. एकावर एक अशी पोत्यांची थप्पी न लावता दोन पोत्यांवर एक अशी पोत्याची थप्पी लावाव्यात. पाच पोत्यांपेक्षा जास्त पोत्यांची थप्पी लावू नाही. आवश्यकतेनुसार भांडाराची साफसफाई व कीटकनाशकाची फवारणी करावी. अशा प्रकारे सोयाबिनाची साठवण करून निगा राखावी. अशा प्रकारे सोयाबीनची कापणी, मळणी तसेच साठवण करताना काळजी घेतल्यास होणार नुकसान टाळता येते.

पत्रकार -

Translate »