धूर संसदेच्या सुरक्षेचा; नळकांडया फोडल्याने लोकसभेत धुराचे साम्राज्य, दोन घुसखोरांसह सहा जणांना अटक
विरोधकांकडून चौकशीची मागणी
नवी दिल्ली : लोकसभेच्या मुख्य सभागृहात दोन घुसखोरांनी धुराच्या नळकांडया फोडल्यामुळे नव्या संसदभवनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मंगळवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे बरोबर २२ वर्षांपूर्वी झालेल्या संसद हल्ल्यानंतर परिस्थितीत बदल झाला नसल्याचे अधोरेखित केले. लोकसभेत तसेच संसदभवन परिसरात धुराच्या नळकांडया फोडणाऱ्या चौघांसह त्यांच्या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. विरोधकांनी या घटनेच्या सखोल चौकशीची मागणी करत सरकारला धारेवर धरले.
लोकसभेमध्ये शून्य प्रहरातील चर्चा सुरू असताना दुपारी १च्या सुमारास सागर शर्मा आणि मनोरंजन डी. या दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून मुख्य सभागृहात उडया घेतल्या. ‘तानाशाही नहीं चलेगी’ अशा घोषणा देत त्यांनी पिवळा धूर सोडणाऱ्या नळकांडया फेकल्या. त्यामुळे सभागृह धुराने भरून गेले. घुसखोरांना उपस्थित खासदारांनी चोप दिला व सुरक्षा रक्षकांकडे सोपविले. त्याच वेळी संसदभवन परिसरात नीलम व अमोल शिंदे या दोघांनीही घोषणाबाजी करत धुराच्या नळकांडया फोडल्या. त्यांनाही पोलिसांनी अटक केली. अमोल हा लातुर जिल्ह्यातील असून शर्मा लखनऊ, मनोरंजन म्हैसूर तर नीलम हरियाणातील हिस्सारची राहणारी आहे.
घटना घडली त्यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी, विधिमंत्री अर्जूनराम मेघवाल, काँग्रेसचे राहुल गांधी, अधिररंजन चौधरी यांच्यासह सुमारे १०० खासदार सभागृहात उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा हे शपथविधी सोहळय़ांसाठी रायपूर व भोपाळला गेल्याने सभागृहात नव्हते. या प्रकारानंतर विरोधी पक्षांच्या खासदारांनी नव्या संसदभवनाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काही खासदारांनी खलिस्तानी अतिरेक्यांनी दिलेल्या इशाऱ्याचीही आठवण करून दिली असली तरी सकृतदर्शनी या घटनेचा त्याच्याशी संबंध दिसत नसल्याचे लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटले आहे.
नेमके काय घडले?
* दुपारी १च्या सुमारास दोघा घुसखोरांनी लोकसभेत धुराच्या नळकांडया फोडल्या
* त्याचवेळी महिलेसह दोघांनी संसदभवन परिसरात नळकांडया फोडल्या
* चौघांनी बुटांमध्ये लपवून नळकांडया आणल्याची प्राथमिक माहिती
* घुसखोरांपैकी एक, अमोल शिंदे हा मुळचा लातूर जिल्ह्यातील रहिवासी
* चार आरोपींसह त्यांच्या दोन साथीदारांना अटक
* घुसखोर कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत का, याचा तपास सुरू
* नव्या संसदभवनाच्या सुरक्षिततेवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह
संसदच सुरक्षित नाही तर देशाचं काय ? – अनंत देशमुख (सामान्य नागरिक)