दहावीच्या विद्यार्थ्याला वर्गमित्रांकडून विवस्त्र करत मारहाण, दारू पिण्यासही भाग पाडलं
उत्तर प्रदेशातील झाशी येथे इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्याला त्याच्या वर्गमित्रांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी पीडित विद्यार्थ्याला विवस्त्र करून मारहाण केली. तसेच त्यांनी पीडित विद्यार्थ्याला दारू पिण्यासही भाग पाडलं. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे.
आरोपी वर्गमित्रांनी पीडित विद्यार्थ्याला शहरातील एका निर्जन भागात घेऊन जात मारहाण केली. यानंतर त्यांनी घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हायरल व्हिडीओत काही विद्यार्थी पीडित विद्यार्थ्याला विवस्त्र करून काठीने मारहाण करताना दिसत आहेत. याबाबतचं वृत्त ‘इंडिया टुडे’नं दिलं आहे.
विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी संध्याकाळी पीडित विद्यार्थी आणि त्याचा एक वर्गमित्र शहरातील एका उद्यानात बसले होते. तेव्हा एक गट तिथे आला आणि त्यांनी पीडित विद्यार्थ्याला जबरदस्तीने कारमध्ये बसवलं. त्यांनी विद्यार्थ्याला मौरानीपूर रस्त्याजवळील जंगलात नेलं. तिथे आरोपीचे आणखी दोन मित्र आले. या टोळक्याने विद्यार्थ्याला दारू पिण्यास भाग पाडलं आणि विवस्त्र करत काठीने मारहाण केली.
“मी त्यांच्यासमोर (आरोपी) हात जोडून विनवणी करत माफी मागितली, पण त्यांनी माझं ऐकलं नाही. त्यांनी सुमारे तासभर मला मारहाण केली. त्यांनी मारहाण करताना मोबाईलवर व्हिडीओही बनवले,” असं पीडित विद्यार्थ्याने तक्रारीत नमूद केलं. मारहाण होत असताना पीडित विद्यार्थी कसाबसा पळून जाण्यात यशस्वी झाला आणि घरी पोहोचला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास केला जात आहे.