करपा रोग : केळी पिकावरील करपा रोग नियंत्रण 🌱
थंडीमुळे केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.कडाक्याची थंडी केळी वरील करपा रोगासाठी पोषक असून अशा वातावरणात केळीच्या बागांवर करपाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या केळीच्या बागांची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे.हा रोग सरकोस्पोरा मुसी बुरशीमुळे होतो. रोगाचे प्रमुख लक्षण म्हणजे केळीच्या खालील ४ ते ५ पानांवर सुरुवातीला लहान-लहान पिवळसर लंबगोलाकार ठिपके पडतात. हे ठिपके मोठे होऊन आतील भाग तपकिरी काळपट रंगाचा होतो.
करपा हा उत्पन्नावर विपरीत परिणाम करणारा रोग आहे.थंडीच्या वातावरणात केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.या रोगामुळे एकुण उत्पादनावर परिणाम होवून मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.यासाठी याची वेळीच काळजी घेण्याची आवश्यकता असते.
करपा रोगास कारणे :-
१.पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा न होणे.
२.रोगग्रस्त बागेतील कंदांचा वापर होणे.
३.शिफारशीपेक्षा कमी अंतरावर लागवड.
४.बागेमध्ये व सभोवताली सर्वसाधारण स्वच्छतेचा अभाव.
प्रतिबंधात्मक :-
लागवड, ओढे, नदीकाठावरील चिबड जमिनीत करु नये.
कंदापासून लागवड करताना वापरण्यात येणाऱ्या मुनव्याचे वय ३ ते ४ महिन्यांचे असावे.
त्याची पाने तलवारीच्या पात्यासारखी अरुंद असावीत.
कंद रोगमुक्त मुनव्यापासून काढलेला असावा.
लागवड शिफारशीत अंतरावर (१.५ मी.x १.५ मी.) किंवा जमिनीच्या मगदुराप्रमाणे करावी.
लागवडीपूर्वी कंद प्रक्रियाः १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम अधिक १५० ग्रॅम ॲसिफेट प्रति १०० लिटर पाण्यात द्रावण करुन त्यात कंद किमान अर्धा तास बुडवून ठेवावेत.
शिफारशीत खत मात्रांचा अवलंब : २०० ग्रॅम नत्र, १६० ग्रॅम स्फुरद, २०० ग्रॅम पालाश प्रतिझाड अशी खतमात्रा वेळापत्रकानुसार द्यावी.
बागेतील वाळलेली, पिवळी, रोगग्रस्त पाने तसेच झाडालगतची पिले नियमित कापावीत.
वाळलेली, पिवळी, रोगग्रस्त पाने बागेबाहेर विल्हेवाट लावून बाग स्वच्छ ठेवावा.
बागेमधील अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी चर काढावा.
बाग नेहमी वाफसा स्थितीत राहील याची काळजी घ्यावी.
ठिबक सिंचनाचा वापर करावा.
बागेत खेळती हवा राहील अशी व्यवस्था करावी.
रासायनिक खतांबरोबरच प्रति झाड १० किलो शेणखत, १५ ग्रॅम अझोस्पिरीलम आणि २५ ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जीवाणू संवर्धक जमिनीत मिसळून द्यावे.
नियंत्रण : रासायनिक फवारणी (प्रतिलिटर पाणी)
• कार्बेन्डाझिम १ ग्रॅम अधिक मिनरल ऑईल १० मि.लि. अधिक सर्फेक्टंट १ मि. लि. प्रतिलिटर पाणी.
• दुसरी फवारणी १५ दिवसांनी करावी यासाठी प्रोपीकोनॅझोल १ मि.लि. अधिक मिनरल ऑईल १० मि.लि. अधिक सर्फेक्टंट १ मि.लि. प्रतिलिटर पाणी.