Paytm Share Price : या शेअरचं ९० दिवसांत ७१% रिटर्न, Mutual Fund ने वाढवली गुंतवणूक..
पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्सच्या शेअर्सवर म्युच्युअल फंड आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांचा विश्वास वाढताना दिसत आहे. जुलै ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत या गुंतवणूकदारांनी आपला हिस्सा वाढवला आहे. पेटीएमचे शेअर्स शेअर बाजारात उत्तम कामगिरी करत असून, कंपनीच्या शेअर किमतीत गेल्या काही महिन्यांत लक्षणीय वाढ झाली आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाही अखेर, म्हणजेच ३० जून २०२४ रोजी पेटीएमच्या शेअरची किंमत ४०२.२० रुपये होती, जी दुसऱ्या तिमाही अखेरीस, म्हणजे ३० सप्टेंबर २०२४ रोजी ६८८.३५ रुपयांवर बंद झाली. या तीन महिन्यांत कंपनीच्या शेअर किमतीत जवळपास ७१ टक्के वाढ झाली आहे. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी पेटीएमचा शेअर किंचित घसरून ७१७.५० रुपयांवर पोहोचला.
जून तिमाहीच्या अखेरीस म्युच्युअल फंडांचा पेटीएममधील एकूण हिस्सा ६.८० टक्के होता, ज्यात त्यांच्याकडे ४.३२ कोटी शेअर्स होते. मात्र, दुसऱ्या तिमाहीच्या अखेरीस म्युच्युअल फंडांचा हिस्सा वाढून ७.८६ टक्क्यांवर पोहोचला आहे. आता म्युच्युअल फंडांकडे पेटीएमचे जवळपास पाच कोटी शेअर्स आहेत. कंपनीच्या दृष्टिकोनातून ही सकारात्मक गोष्ट आहे, कारण संस्थात्मक गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारही कंपनीच्या शेअर्सकडे आकर्षित होत आहेत.
पेटीएमच्या शेअर्समध्ये म्युच्युअल फंडांचा सहभाग वाढताना दिसत आहे. निप्पॉन म्युच्युअल फंडाने पेटीएममधील आपला हिस्सा वाढवून पहिल्या तिमाहीत १.११ कोटी शेअर्सवरून दुसऱ्या तिमाहीत १.४४ कोटी शेअर्सपर्यंत नेला आहे. त्यामुळे कंपनीतील निप्पॉनचा हिस्सा १.७६ टक्क्यांवरून २.२७ टक्क्यांवर वाढला आहे. त्याचप्रमाणे, मिराए म्युच्युअल फंडानेही आपला हिस्सा वाढवून आता ४.४९ टक्के केला आहे.
आज बीएसईवर पेटीएमचा शेअर ७३० रुपयांवर उघडला आणि त्यानंतर तो ७३५.८० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. मात्र, नंतर त्यात घसरण पाहायला मिळाली. सध्या पेटीएमचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ९९८.३० रुपये आणि नीचांकी स्तर ३१० रुपये आहे.
(टीप – या माहितीत केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. ही गुंतवणुकीची शिफारस नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा किंवा जाणकारांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)