Nashik: नाशिक जिल्ह्यात कांदा चोरीच्या घटनांमध्ये वाढ
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव परिसरातील उंबरखेड रोडवरील कांदा व्यापाऱ्याच्या खळ्यावर चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे.
या घटनेमुळे व्यापारी आणि परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः कांद्याला समाधानकारक भाव मिळत असल्याने चोरट्यांनी कांद्याच्या साठ्यांवर डोळा ठेवला आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी वर्गात असुरक्षिततेची भावना वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, कांदा व्यापाऱ्यांनी पिंपळगाव पोलिस ठाण्यात निवेदन देऊन चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या मागणीची गंभीर दखल घेतली असून, परिसरात अधिक गस्त वाढवण्याचे आश्वासन दिले आहे.
पिंपळगाव परिसरातील उंबरखेड रोडवरील कांदा व्यापाऱ्याच्या खळ्यावर चोरट्यांनी चोरी केली. मात्र, तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये आपण पकडले गेलो असू, या भीतीने त्याच चोरट्यांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा तेथे जाऊन तार कंपाऊंड कापले आणि ऑफिसमधील सीसीटीव्ही कॅमेरे नष्ट करून डीव्हीआर पळवला. चोरट्यांच्या या कुशलतेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.