Ration Card: रेशनकार्ड सदस्याला ई-केवायसी करणे बंधनकारक; ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ
केंद्र सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक केली असून यामध्ये कुटुंबातील प्रत्येक सदस्याला पडताळणी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य ठरले आहे. आधी या प्रक्रियेची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२४ निश्चित करण्यात आली होती, परंतु यामध्ये मुदतवाढ देण्यात येऊन आता ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत सर्व लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे आवश्यक आहे.
शासकीय योजनांच्या लाभासाठी ई-केवायसी अत्यावश्यक
आजच्या घडीला सरकारी योजनांच्या प्रत्येक लाभार्थ्याला ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. बँकेच्या खात्यासोबतच, शासकीय योजनांच्या लाभांसाठीही हे अनिवार्य करण्यात आले आहे. या नव्या निर्णयांतर्गत रेशनकार्ड लाभासाठी देखील ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य झाले आहे.
काही महिन्यांपूर्वी सरकारने केशरी, पांढऱ्या आणि पिवळ्या रेशनकार्ड धारकांसाठी ई-केवायसी करण्याची मार्गदर्शक तत्त्वे लागू केली होती. त्यानुसार, सर्व रेशनकार्ड धारकांना ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक राहील.
रेशन दुकानांमध्ये ई-केवायसीची सोय उपलब्ध
रेशनकार्ड धारकांची ई-केवायसी प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी स्वस्त धान्य दुकानांमध्येही ई ho-केवायसीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. फोर-जी ई-पॉस मशीनच्या माध्यमातून आधारकार्डचा क्रमांक टाकून आणि बोटांचे ठसे तसेच डोळ्यांचे स्कॅन करून प्रक्रिया पूर्ण केली जाते.
पुरवठा विभागाच्या सूचनेनुसार, शिधापत्रिकेत नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीने ई-केवायसी करणे आवश्यक आहे. जर कुटुंबातील कोणत्याही सदस्याने ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर त्यांना धान्य वितरणाच्या सेवेतून वंचित रहावे लागू शकते.