Fengal Cyclone Alert : देशावर मोठं संकट, काही तासांत धडकणार; हवामान विभागाचा अतिमुसळधार पावसाचा इशारा
चक्रीवादळाच्या स्वरूपात मोठं नैसर्गिक संकट पुन्हा एकदा देशावर घोंगावत आहे. ‘फेंगल’ नावाच्या या चक्रीवादळाने दक्षिण भारतातील अनेक राज्यांना धोक्याचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पुद्दुचेरी यांसारख्या राज्यांवर या वादळाचा तीव्र परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित राज्यांमध्ये नागरिकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
चक्रीवादळ फेंगलची स्थिती
दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानंतर या वादळाची निर्मिती झाली आहे. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, हे वादळ उत्तर-पश्चिम दिशेकडे सरकत असून, तामिळनाडूच्या किनारपट्टीवर कराईकल आणि महाबलीपुरमदरम्यान लवकरच धडकण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 70 किलोमीटरपर्यंत पोहोचेल, ज्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर हानी होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाचा इशारा
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, 29 नोव्हेंबर आणि 30 नोव्हेंबर रोजी तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडूतील महाबलीपुरम आणि चेन्नईसारख्या शहरांमध्ये वादळाचा मोठा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. यामुळे समुद्रकिनारी मोठ्या लाटांचा सामना करावा लागणार आहे. श्रीलंकेच्या त्रिंकोमालीपासून अवघ्या 110 किलोमीटर अंतरावर असलेल्या या चक्रीवादळाचा प्रभाव भारताच्या किनारी भागांवर देखील जाणवेल.
संबंधित राज्यांमध्ये काय परिस्थिती?
तामिळनाडूसह आंध्र प्रदेशचा किनारी भाग, रायलसीमा आणि पुद्दुचेरीमध्ये मोठ्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भागांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. मत्स्य व्यवसाय करणाऱ्या लोकांना किनाऱ्यापासून दूर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विजेच्या तारांपासून दूर राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात चक्रीवादळाचा काय परिणाम?
हवामान विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात फेंगल चक्रीवादळाचा फारसा परिणाम होणार नाही. मात्र, कोकण किनारपट्टीच्या काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात ढगाळ हवामान आणि कमी पाऊस यामुळे वातावरणात बदल जाणवू शकतो.