कडक भूमिका घ्या, दिल्लीश्वरांकडून फडणवीसांना सूचना, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यामागील गोष्ट समोर

मुंबई : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून गेले काही महिने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी अखेर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. देशमुख हत्या प्रकरणात मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याचा सहभाग निश्चित झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. तरीही ताठर भूमिका स्वीकारणाऱ्या मुंडे यांना, ‘राजीनामा न दिल्यास कारवाई करावी लागेल’, असा अंतिम इशारा मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतरच मुंडे यांना पायउतार होणे भाग पडले.

मुंडे सोमवारी दुपारी भेटीसाठी आले असता मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना राजीनामा न दिल्यास कारवाई करावी लागेल, असे स्पष्ट केले. त्यानंतर रात्री देशमुख हत्याप्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातील काही छायाचित्रे सर्वत्र प्रसिद्ध झाली. ही छायाचित्रे नागरिकांचे मन विषण्ण करणारी असल्याने यातून राज्य सरकारची प्रतिमा डागाळली जाणार, या जाणिवेतून रात्री उशिरा सरकारदरबारी वेगाने घडामोडी घडल्या.

या प्रकरणात कडक भूमिका घेण्याबाबत भाजपच्या दिल्लीतील शीर्षस्थ नेतृत्वाकडूनही सूचना आल्याचे समजते. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाली. मुंडे आता राजीनामा देणार नसतील तर त्यांच्याविरोधात कारवाई करावी लागेल, अशीच स्पष्ट भूमिका यावेळी फडणवीस यांनी घेतल्याचे समजते. यानंतर फडणवीस यांनी मुंडे यांच्याशीही संवाद साधला. मंत्रिपदाचा राजीनामा न दिल्यास राज्यपालांना पत्र पाठवून कारवाई करण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा दिला व राजीनाम्यासाठी मंगळवार सकाळपर्यंतची मुदत दिली. मुख्यमंत्री प्रचंड आग्रही असल्याचे पाहून मंगळवारी मुंडे यांना अखेर राजीनामा द्यावाच लागला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारत तो राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे पाठवला. राज्यपालांनीही मुंडे यांचा राजीनामा मंजूर केला. ‘धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारला असून, पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. मुंडे यांना मंत्रिपदावरून मुक्त करण्यात आले आहे’, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांना दिली.

देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याच्या आरोपावरून गेले दोन महिने विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली होती. मात्र यासंदर्भात सीआयडी तपास करीत असून, त्यांचा अहवाल आला की कारवाई केली जाईल, अशा प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून प्रसारमाध्यमांना देण्यात येत होत्या. मध्यंतरीच्या काळात कराड तसेच इतर आरोपींतील संभाषण तसेच आरोपींचे काही व्हिडीओ प्रसारमाध्यमांमध्ये झळकत होते. याशिवाय आमदार सुरेश धस यांच्याकडून सातत्याने धनंजय मुंडे तसेच या प्रकरणातील आरोपी यांच्यात कसे लागेबांधे आहेत, याचे कथन केले जात होते. मुंडे यांच्या राजीनाम्याबाबतचा दबाव वाढला होता.

विरोधकांना शांत करण्यासाठी या प्रकरणाच्या तपासाचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी भूमिका फडणवीस तसेच पवार या दोन्ही नेत्यांनी घेतल्याचे समजते. मुंडे मात्र राजीनामा न देण्याच्या भूमिकेवर ठाम होते. त्यांना याबाबत अजित पवार यांनीही समजावण्याचा प्रयत्न केला. पवार यांनी, आपण स्वतः व छगन भुजबळ यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला होता, याची आठवण करून देत मुंडे ताठर भूमिकेत असल्याचे स्पष्ट केले होते.

पत्रकार -

Translate »