किरणकुमार आवारे..*✍️:
लेख संकलन -पत्रकार उत्तम आवारे काजी सांगवी
मी लासलगाव बाजार समितीत जेव्हा जेव्हा जातो तेव्हा तेव्हा मी अन्याय सहन करायचा नाही म्हणून वाद उपस्थित होतो. त्यावर ब्लॉग लिहितो. एकदा तर ब्लॉग वाचून पणन महामंडळाची बाजार समितीला नोटीस देखील आली होती.
असो, मला आठवते त्यावेळी मी ब्लॉग मध्ये लासलगाव बाजार समितीला दिलीपकाका बनकर किंवा पंढरीनाथ थोरे यांच्यासारखे खमके नेतृत्व असायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, मला पिंपळगाव बसवंत बाजार समितीवर ब्लॉग लिहावा लागेल असे स्वप्नात देखील वाटले नव्हते. दिलीपकाका बनकर यांचे वरपांगी नेतृत्व १०० नंबरी असेलही मात्र, तळागाळात काय चालते याकडे त्यांचे दुर्लक्ष होत असावे, कारण या बाजार समितीत व्यापारी व शेतकरी हे वाद नित्याचेच झाले आहेत. वाद होण्याचे कारण हेच आहे की, टोमॅटो व्यापारी माल खरेदी करतात आणि गाळ्यावर सर्रास वांदे काढून शेतकऱ्यांची लूटमार करतात आणि कुणी त्याला विरोध केला तर त्याला संघटितपणे आपला हिसका दाखवतात. बाजार समित्या या मुळात शेतकऱ्यांसाठी निर्माण केल्या गेल्या आहेत त्या व्यापाऱ्यांसाठी नव्हे. त्यामुळे या बाजार समित्यांसाठी शेतकरी उपरा होऊ नये याची दखल बाजार समित्यांनी घेतली पाहिजे.
*वडगाव पंगू ता.चांदवड येथील शेतकऱ्यांना पिंपळगाव बसवंत बाजार समितीत आलेला थरारक अनुभव, माझ्या शब्दात..*
दि.१ सप्टेंबर रोजी वडगाव पंगू येथील मयूर वाळूबा गोजरे, ऋषीकेश संपत गोजरे व विकी बाळू गोजरे हि शेतकरी मुले एका पिकअप गाडीत तीन वक्कल टोमॅटो घेऊन पिंपळगाव बसवंत बाजार समितीत गेले. मच्छिन्द्रनाथ व्हेजिटेबल कंपनीने तिन्ही वक्कल ५२१ ने खरेदी केले. नंतर खळ्यावर माल खाली करण्यासाठी गेले असता त्यांनी २१ रुपये कमी करावे लागेल अशी अट घातली. ती मयूरने मान्य केल्याने त्याचा माल खाली केला गेला. बाकीच्या दोघांनी भाव कमी करायला तयारी न दाखवता माल परत मार्केटला आणला. तेथे त्यांचा माल ४७० रुपयाने मागितला. परत गाळ्यावर आल्यावर त्यांनी वांदा काढत ३५० रु.ने माल खाली करावा लागेल अशी अट घातली. यांना ती मान्य न झाल्याने परत मार्केटला गेले. तेथे त्यांचा माल कृष्णा व्हेजिटेबल कंपनीमार्फत एक परप्रांतीय व्यापाऱ्याने ४२१ रुपयाने खरेदी केला. यावर शेतकऱ्यांनी, ‘माल चांगला पाहून घ्या, आम्ही दोनदा परत आलो आहोत, परत खळखळ नको’ असे म्हणल्यावर तो व्यापारी गाडीवर चढला व माल व्यवस्थित पाहून घेतला व ‘ गाडी खाली होऊन जाईल काळजी करू नका’ असे सांगितले व गाडीसोबत गाळ्यावर आला. तेथे त्याचा मोठा भाऊ होता त्याने त्याला डोळा मारला. त्यानंतर तो निघून जाऊ लागला. त्याला शेतकरी बोलले,’ गाडी खाली होईपर्यंत थांबा’ त्यावर तो बोलला, ‘मला अजून माल खरेदी करायचा आहे, माल खाली होऊन जाईल’ असे म्हणून तो निघून गेला. मोठ्या भावाने दोन चार कॅरेट खाली केले व भाव कमी करावा लागेल व मला ३७० रु.भाव चालेल असे सांगितले. दोन तीन चक्कर झाल्याने आधीच वैतागलेल्या शेतकऱ्यांनी,’आम्ही भाव नक्की पक्की करून आलो आहोत, भाव कमी करू नका, तिथे सुपर मालाचा भाव घेतात व इथे येऊन कमी करतात’ असे म्हटल्यानंतर व्यापाऱ्याने, ‘हा भाव लागत असेल तर मालाची निवड करून द्या’ असे सांगितले. त्यावर मयूर म्हटला, ‘मालाची निवड करून आणला असता तर त्याला एक्स्पोर्टचा भाव मिळाला असता आम्ही लोकलला कशाला आलो असतो?’ त्यावर त्या व्यापाऱ्याने, ‘पटत असेल तर माल टाक नाहीतर निघा’ अशी ताकीद दिली. त्यावर शेतकरी परत गाडी घेऊन मार्केटला आले. तेथे तो खरेदीदार व्यापारी पुन्हा हजर.. तो गाडीजवळ आला असता, मयूर बोलला, ‘तू आमच्या गाडीजवळ येऊ नको, आम्हाला तुला मालच द्यायचा नाही.’ त्यावर तो चिडला व ‘ का येऊ नको? तू सांगणारा कोण?’ असे तावातावात बोलला. यावर मयूर चिडला व ‘आम्हा शेतकऱ्यांना तुम्ही चुत्या समजतात काय? आमचे किती हेलपाटे झाले? आमचे किती डिझेल नासले? आम्हाला किती त्रास झाला? तुम्ही काय चुत्यापणा लावला आहे?’ यावरून त्यांची बाचाबाची झाली यात व्यापाऱ्याने मयूरची गच्ची धरून आईवरून शिवी दिली. मयूर चिडला व त्यानेही व्यापाऱ्याची गच्ची धरली. यावर व्यापारी चिडला व त्याने मयूरच्या गालात मारली. आवाज ऐकून ऋषीकेश गाडीतून पळत आला व त्यानेही व्यापाऱ्याची गच्ची धरली व त्याच्या गालात मारली, त्यावर व्यापाऱ्याने आरडा – ओरडा करून इतर व्यापाऱ्यांना बोलावून घेतले. सगळे व्यापारी गोळा झाले. आपल्या गाडीला काही करतील म्हणून ऋषीकेशने गाडी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला असता व्यापारी पळत आले. चार पाच व्यापारी गाडीवर चढले. काहींनी हवा काढली. यात गर्दी वाढायला लागली. म्हणून ते जीव वाचवायला गर्दीत सामील झाले. त्यांनी फोन करून माणसे भरून आयशर बोलवला, आयशरला दोर लावून गाडी ओढून नेण्याचा प्रयत्न केला. पण गाडीला स्टेरिंग लॉक असल्याने गाडी हलली नाही. तोपर्यंत विकीने त्यांच्या गावातीलच काही शेतकरी पिंपळगावला टोमॅटो घेऊन आले होते, त्यातील शंकर गोजरे व गोरख सोनवणे यांना फोन केला व घटना सांगितली. ते ताबडतोब गाडीजवळ आले व ‘गाडी नेऊ नका माझ्या भावाची गाडी आहे’ असे सांगितले. भावाची गाडी म्हणल्यावर त्यांनी चान्स साधत शंकरला मारहाण केली.
*ऋषीकेशचे अपहरण व थरार*
व्यापाऱ्यांनी वातावरण गंभीर केल्याने जीव वाचवण्यासाठी सर्व पळत पळत बाजार समिती कार्यालयात गेले. तेथे दोन कर्मचारी बसले होते. तेथे त्यांच्या मागोमाग व्यापारीही आले. कर्मचाऱ्यांनी थेटे नामक कर्मचाऱ्याला फोन लावला. त्यानंतर व्यापाऱ्याने बाजार समिती कर्मचाऱ्यांच्या देखत ऋषीकेशच्या खांद्यावर हात टाकून त्याला बाजूला व्यापारी जमले होते त्या घोळक्यात घेऊन गेले. त्यांनी खाजगी गाडी बोलावून त्यात ऋषिकेशला घातले व एक-दोन चक्कर मार्केटमध्ये फिरवले, शिवीगाळ व मारहाण केली. गाडीत एकूण चार लोकं होते. नंतर गाडी गावाकडे घेतली. त्यावेळी ऋषिकेशला शंकरचा फोन आला व ‘तू कोठे आहे?’ अशी विचारपुस करू लागला. त्यावर त्या लोकांनी फोन हिसकावून घेतला. कुणाचा फोन आल्यावर ते फोन कट करत असत. त्यांचे फोनवर कुणाशी तरी संभाषण सुरू होते,’ आम्ही अमुक ठिकाणी चाललो, तुम्ही तिथे या’ असे म्हणत गावात पाटाच्या पुढे एका बिल्डिंगपुढे गाडी उभी केली. तेथे त्यांना ऋषिकेशला त्या खोलीत नेऊन मारहाण करायची होती. मात्र, तेवढ्यात त्यांना विकी गांगुर्डे नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्यांनी सांगितले, ‘तुम्ही त्या मुलाला घेऊन गेले, त्यामुळे गाळ्यावर शेतकरी जमले आहेत. ते संतप्त आहेत तोडफोड होऊ शकते, त्याला मारहाण करू नका, तुम्ही त्याला सुखरूप परत घेऊन या’ त्यानंतर त्यांनी पवित्रा बदलत गाडी पोलीस स्टेशनला घेतली. तोपर्यंत व्यापाऱ्याने कपडे फाडून घेतले. तेथे पोलिसांच्या ताब्यात देतांना, ‘हा पोरगा गुंड आहे, याच्यावर अगोदर दोन तीन केसेस आहेत’ असे खोटे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी चौकशी न करता अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली. ऋषीकेश आतंकवादी असल्यासारखे त्याच्याकडून फोन जप्त केला. तोपर्यंत गावच्या शेतकऱ्यांनी घरी फोन केले. घरच्यांकडून आम्हाला फोन आले. ऋषीकेशचा मामा संतोष निफाडे दिल्ली येथे एन एस जी कमांडो ट्रेनिंग सेंटर इंचार्ज आहे त्याला फोन केला. त्याचा फोन पोलिसांना गेला असता स्क्रीनवर मामा कमांडो असे नाव आल्याने पोलिसांनी, ‘तुझा मामा कमांडो आहे का?’ असे विचारले असता ऋषीकेश ‘हो’ म्हटला, मग त्यांनी त्याला फोन दिला. त्यानंतर माझा फोन गेला त्यावर पोलिसांनी,’आवारे यांचा फोन येत आहे ते तुझे कोण आहेत?’ त्यावर ऋषीकेशने, ‘ते माझे काका आहेत व पत्रकार आहेत’ असे सांगितले, मग त्यांनी फोन दिला व ऋषीकेश माझ्याशी बोलला. तो प्रचंड घाबरला होता. मी त्याला दिलासा दिला व पोलिसाकडे दे असे सांगितले. मी त्यांना,’शेतकरी विरुद्द व्यापारी वाद आहे, तुम्ही शेतकऱ्यांची बाजू घ्यायची सोडून व्यापाऱ्यांची कशी काय घेत आहेत?’ अशी विचारणा केली असता त्यांची भाषा बदलली व काही प्रॉब्लेम नाही देशमुख साहेब आले की, सोडून देतो असे सांगितले. त्यानंतर कमांडोने दिलीप काका याना फोन लावला ते आरतीत होते म्हणून त्यांनी उचलला नाही. मी मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष आण्णापाटील बोरगुडे यांच्याशी बोललो ते काकांचे स्वीय सहाय्यक घोलप यांचेशी बोलले, मीही त्यांचेशी बोललो. पिंपळगाव येथील एक पत्रकाराशी मी बोललो असता त्यांनी तातडीने संचालक नंदू गांगुर्डे याना फोन केला असता त्यांनीही मदत केल्याने ऋषीकेशची कशीबशी सुटका झाली. शंकरला मारले तेव्हा तेथे दिघवदचे शेतकरी होते. त्यांनी विचारलं, ‘तू कुठला आहे?’ त्यावर त्याने, ‘मी वडगाव पंगू येथील असून मी प्रहारचा अध्यक्ष आहे’ असे सांगितले. यावर त्यांनी लगेच गणेशभाऊ निंबाळकर यांना फोन लावला, त्यांचाही फोन आला. आपल्या परिसरातील व प्रहार कार्यकर्त्याला मारहाण झाली हे पाहून ते शेतकरी चिडले व त्यांनी बाजार समितीची रुग्णवाहिका घेऊन गाळा गाठला व तेथेही चांगला जमाव जमला.
या प्रकरणात सगळ्यात वाईट असे की, त्या गाळ्याचा मालक व आडती सम्राट बनकर याने शेतकऱ्यांची बाजू न घेता परप्रांतीय व्यापाऱ्यांची बाजू घेत शेतकऱ्यांना गंभीर वागणूक देत त्यांच्यात सामील झाला. एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने ऋषीकेशचे त्याच्या मोबाईल मध्ये फोटो काढले. यातून त्याचा उद्देश काय समजायचा? परत ऋषीकेश बाजार समितीत गेला तर त्याला त्याचा बदला घ्यायचा आहे का? व्यापाऱ्याच्या या कृतीने संबधित शेतकरी मुले प्रचंड धास्तीत आहेत त्या दिवसानंतर त्यांनी पिंपळगावला टोमॅटो विक्रीस नेणे बंद केले आहे. नंतर हीच मुले हॉटेल मध्ये जेवायला गेले असता वागदर्डी ता.चांदवड येथील शेतकऱ्यांनी आमचे बारीक टोमॅटो १३० रु गेले त्यातही वांदा काढून झोळीवर घेतले यापेक्षा दुर्दैव काय? असे सांगितले.
पिंपळगांव बसवंत बाजार समितीत चढ्या भावाने माल खरेदी करून गाळ्यावर अडवणूक करत भाव कमी करणे ही सर्रास बाब झाली आहे. त्यातून व्यापारी व शेतकरी वाद वाढत आहेत. त्यात परप्रांतीय व्यापारी जास्त माजले आहेत, त्यांना कुणाची भीती राहिली नाही. शेतकऱ्यांच्या बाजार समितीत त्यांच्यावरच हात उचलला जातो ही साधी गोष्ट नाही. यामुळे शेतकरी वैतागले आहेत. आज हिवरगाव येथील मार्केट मध्ये शेतकऱ्यांना चांगली वागणूक मिळत असल्याने त्यांनी पिंपळगावची सुमारे दीड लाख कॅरेटची आवक त्यांनी खाऊन टाकली आहे, असे एक जाणकार पत्रकाराने सांगितले. मी याबाबत बाजार समिती सचिव संजय लोंढे यांना सविस्तर सांगून कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. हा लेख बाजार समिती चेअरमन व संचालक मंडळापर्यंत गेला तर त्यांचेकडून कार्यवाही अपेक्षित आहेच. आजच दि.८ सप्टें २०२५ नाशिक माझाने याच बाजार समितीत शेतकऱ्याची झालेली अवहेलना यावर बातमी दाखवली. मी संपादकांशी बोललो असता, त्यांनी शेतकरी अक्षरशः रडत होता असे त्यांनी सांगितले. बाजार समितीला शेतकऱ्यांचे अश्रू दिसत नसतील तर इंग्रजच बरे होते व त्यांनी शेतमाल त्यांच्या देशात वाहून नेण्यासाठी स्थापन केलेले बोर्डच बरे होते असे दुर्दैवाने म्हणावे लागेल.