कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): जनसुरक्षा कायद्याविरोधात देवळा येथे शिवसेना (ठाकरे गट)चे निवेदन

केंद्र सरकारने आणलेल्या जनसुरक्षा कायद्याद्वारे सामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे गट)ने केला आहे. या कायद्याला विरोध करण्यासाठी आज देवळा येथे ठाकरे गटाच्या वतीने तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांना हा कायदा तात्काळ रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले. यावेळी देवळा येथील शिवसेना (ठाकरे गट)चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, शेतकरी, कामगार, तरुण आणि सुशिक्षित वर्ग आपापल्या हक्कांसाठी नेहमी आवाज उठवत असतो. मात्र केंद्र सरकारने जनसुरक्षा कायदा लागू करून या वर्गांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. या कायद्यामुळे आंदोलने करणे किंवा सरकारविरोधात मत व्यक्त करणे गुन्हा ठरणार असून, त्यामुळे लोकशाही गंभीर संकटात सापडणार आहे.

शिवसेनेच्या मते, हा कायदा लागू करून केंद्र सरकारने लोकशाहीची पायमल्ली केली आहे. या कायद्यानुसार न्यायालयीन कारवाईशिवाय कोणत्याही व्यक्तीला तुरुंगात डांबण्याचे अधिकार सरकारला मिळाले आहेत. त्यामुळे व्यक्तीस्वातंत्र्य धोक्यात आले असून मानवी हक्कांचे उल्लंघन होण्याची शक्यता आहे.

“जनतेचा आवाज दडपणारा आणि लोकशाही हक्कांचे हनन करणारा हा जनविरोधी कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा,” अशी ठाम मागणी ठाकरे गटाने केली आहे.

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »