लेपाक्षीचा लटकता स्तंभ – वास्तुकलेच्या गूढतेत दडलेले रहस्य

आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील लेपाक्षी गाव… अरुंद रस्ते, लालसर माती आणि गावाच्या मध्यभागी उभा असलेला इतिहासाचा साक्षीदार – वीरभद्र मंदिर. १६व्या शतकात विजयनगर साम्राज्यात बांधलेले हे मंदिर दूरदूरच्या पर्यटकांना केवळ आपल्या शिल्पकलेसाठीच नव्हे तर एका विलक्षण रहस्यामुळे आकर्षित करते.

मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केला की नजरेत भरतात ते उंचचउंच दगडी स्तंभ. हे सर्व खांब जमिनीवर घट्ट बसवलेले आहेत. पण त्यांच्यामध्ये एक आहे असा की जो शतकानुशतके जमिनीला स्पर्श न करता हवेत तरंगत असल्यासारखा दिसतो. होय, हा आहे लेपाक्षीचा प्रसिद्ध लटकता स्तंभ. या खांबाखालून सहजपणे रुमाल, काठी किंवा कागद सरकवता येतो आणि तो दुसऱ्या बाजूला निसटून जातो.

स्थानिक लोकांच्या मते, या स्तंभाखाली कापड पास केले की घरात सुख-शांती व समृद्धी लाभते. त्यामुळे दररोज शेकडो पर्यटक या स्तंभाखाली कापड सरकवून आपल्या डोळ्यांनी हा चमत्कार अनुभवतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा खांब लटकता असूनही त्यावर उभा असलेला संपूर्ण मंडप आजही तितक्याच मजबुतीने उभा आहे.

या रहस्यामागे अनेक कथा सांगितल्या जातात. काही जण म्हणतात की हा खांब ही प्राचीन भारतीय वास्तुकलेतील अतुलनीय संतुलनकलेचा नमुना आहे. विजयनगर साम्राज्यातील शिल्पकारांनी अत्यंत अचूक गणिती मोजमाप वापरून हे बांधकाम केले होते. ब्रिटिश राजवटीत एका अभियंत्याने हा खांब जमिनीवर आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यामुळे मंदिराच्या काही भागात तडे गेले आणि त्यानंतर हा प्रयत्न सोडून देण्यात आला.

पण स्थानिकांमध्ये याबद्दल वेगळीच धारणा आहे. त्यांच्या मते, हे साधं शिल्पकौशल्य नाही, तर दैवी शक्तीचं प्रतिक आहे. वीरभद्र देवतेच्या मंदिरात असलेला हा खांब त्यांच्या अदृश्य सामर्थ्याचं प्रतीक मानला जातो.

लेपाक्षी मंदिराला भेट दिली की केवळ हा स्तंभच नव्हे तर त्याभोवतीची भव्य शिल्पकला, विशाल नंदीची मूर्ती, भित्तीचित्रे आणि शतकानुशतके अबाधित राहिलेली कारागिरी हे सारे पाहून पर्यटक थक्क होतात.

आज लेपाक्षीचा हा लटकता स्तंभ जगभरातील इतिहासकार, वैज्ञानिक आणि पर्यटकांसाठी एक अनुत्तरित कोडं बनला आहे. विज्ञान त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहे, पण भक्त मात्र अजूनही त्याला देवाची देणगी मानतात. रहस्य असो वा श्रद्धा – लेपाक्षीचा हा अनुभव मनात कायम घर करून जातो.

पत्रकार -

Translate »