कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): चांदवड │ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींना विशेष अनुदान म्हणून ‘नमो उद्यान’ उभारणीसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याअंतर्गत चांदवड नगरपरिषदेला १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून या निधीतून शहरात उत्कृष्ट उद्यान विकसित होणार आहे. याबाबतची माहिती चांदवड नगर परिषदेचे माजी प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी दिली.
नगरविकास विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत हा निधी नगरपरिषद स्तरावर उपलब्ध करून दिला जात आहे. शहरातील उद्यानांची देखभाल, दुरुस्ती आणि नव्याने विकास करण्यासाठी निधीची उपलब्धता सोपी व्हावी हा उद्देश आहे.
याबाबतचा शासन निर्णय बुधवार, दि. १७ सप्टेंबर रोजी जाहीर झाला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून राज्यातील नगरपरिषदांना हा विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे.
या अंतर्गत विकसित होणाऱ्या उद्यानांची विभागवार स्पर्धा घेण्यात येणार आहे. प्रत्येक विभागातून तीन उद्यानांची निवड होईल. प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या नगरपरिषदेला ५ कोटी रुपये, दुसऱ्या क्रमांकास ३ कोटी रुपये तर तिसऱ्या क्रमांकास २ कोटी रुपये अतिरिक्त निधी देण्यात येणार आहे.
चांदवड नगर परिषदेत आरक्षित जागांवर हे उद्यान उभारण्यात येणार असून, स्थानिक नागरिकांना दर्जेदार सुविधा व आनंददायी वातावरण मिळावे यासाठी या कार्याला लवकरच सुरुवात होईल, असे भूषण कासलीवाल यांनी सांगितले.
