शेतकऱ्यांच्या जखमांना कवितेची फुंकर : विठ्ठल वाघ काव्य पुरस्कार २०२४

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): मॅग्नस फार्म येथे नुकत्याच पार पडलेल्या लोककवी विठ्ठल वाघ राज्यस्तरीय काव्य पुरस्कार २०२४ च्या सोहळ्यात यावर्षीचा काव्य पुरस्कार सागर जाधव जोपुळकर यांच्या “माती मागतेय पेनकिलर” या काव्यसंग्रहाला जाहीर झाला. त्याचबरोबर हवामान तज्ञ दिपक जाधव यांना मॅग्नस कृषीरत्न पुरस्कार तर सिन्नर तालुक्यातील प्रगतशील शेतकरी विष्णू दिघे यांना उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अकरा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या तिन्ही पुरस्कारांचे स्वरूप होते. या सोहळ्यास शेतकरी, साहित्यप्रेमी व विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ कवी लक्ष्मण महाडीक, कवी संदीप जगताप, कृषी अभ्यासक अनुदादा मोरे, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, मॅग्नस फार्मचे संचालक लक्ष्मण सावळकर आणि गिरीश सारडा यांची प्रमुख उपस्थिती होती. तशेच भास्कर नाना बनकर, बाळासाहेब गडाख, कांतामामा बनकर, दत्तभाऊ कोतवाल, किरण ठाकरे, जावेद शेख यांसह जिल्हाभरातून आलेले शेतकरी व मान्यवरही या सोहळ्याला लाभले.

कवी संदीप जगताप यांनी सागर जाधव जोपुळकर यांच्या कवितेचे कौतुक करताना सांगितले की, “सागर जाधव जोपुळकरांच्या कवितेत मातीशी नाते जिव्हाळ्याचे आहे, शेतकऱ्याच्या वेदना आणि वास्तव त्यांनी कवितेतून प्रांजळपणे व्यक्त केल्या आहेत. ‘माती मागतेय पेनकिलर’ हा संग्रह शेतकऱ्याच्या आत्म्याचा आवाज आहे.” त्यावर ज्येष्ठ कवी लक्ष्मण महाडीक यांनी मराठी साहित्याच्या संदर्भात भावना व्यक्त करताना म्हटले की, “मराठी कविता आता फक्त भावनांच्या ओघापुरती मर्यादित नाही राहिली. ती समाजाच्या अंतरंगाला हात घालते, प्रश्न विचारते आणि बदलाची दिशा दाखवते. सागर जाधव यांच्या लेखणीत हे नवे भान प्रकर्षाने दिसून येते.” द्राक्षबागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांनी शेतीसंदर्भात विचार मांडताना सांगितले की, “शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञानाइतकेच साहित्याचेही महत्त्व आहे. कविता जर शेतकऱ्याच्या जखमांवर फुंकर घालू शकली, तर ती खरी समाजामध्ये सकारात्मक बदल घडवणारी ठरते.”
पुरस्कार स्वीकारताना कवी सागर जाधव जोपुळकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, “हा पुरस्कार माझ्यासाठी व्यक्तिगत अभिमानाचा क्षण आहे, पण त्यापेक्षा तो ग्रामीण जीवनाचे आणि शेतकरी भावविश्वाचे प्रतिनिधीत्व करणारा गौरव आहे. गुरुजनांचे आशीर्वाद, तसेच वाचकांचे प्रेम हा माझ्या लेखणीतला खरा आधार आहे.” हवामान तज्ञ दिपक जाधव यांनी कृषीरत्न पुरस्काराबद्दल बोलताना कृतज्ञतेची भावना व्यक्त करून सांगितले की, “हा सन्मान माझ्यासाठी जितका आहे, तितकाच तो प्रत्येक शेतकऱ्याच्या मेहनतीचा आणि धैर्याचा गौरव आहे. हवामानाच्या प्रतिकूलतेशी लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टांची ही खरी दखल आहे.”
या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे पुरस्कार वितरणानंतर प्रथमच कृषी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांनी या चर्चासत्राला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता हा प्रयोग यशस्वी झाल्याचे आयोजकांनी सांगितले. या संपूर्ण सोहळ्याची जबाबदारी मॅग्नस फार्मने घेतली होती. संचालक लक्ष्मण सावळकर व गिरीश सारडा यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मॅग्नस परिवाराने गेल्या अनेक दिवसांपासून मेहनत घेऊन या कार्यक्रमाची तयारी केली होती. त्यांच्या प्रयत्नांमुळे साहित्य, शेती आणि समाज या तिन्ही क्षेत्रांचा संगम घडवणारा हा सोहळा संस्मरणीय ठरला.

पत्रकार -

Translate »