णमोकार जैन तीर्थक्षेत्र आराखड्याची व भौतिक सुख सुविधा बाबतची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अध्यक्षतेखाली संपन्न

…
कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) : श्री.णमोकार तीर्थक्षेत्र मालसाने येथे सकल जैन समाजाचा कुंभमेळा होत असून भौतिक सुख सुविधांचा आराखड्याला मान्यता देणे व मुख्यमंत्री साहेब यांच्या दालनात बैठक लावणे बाबत यापूर्वी भूषण कासलीवाल व णमोकार तीर्थक्षेत्र येथील ट्रस्टी यांनी कळविले होते.
त्या प्रमाणे दिनांक 4/10 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, छगनराव भुजबळ, शिक्षण मंत्री दादा भुसे, चांदवड देवळा विधानसभेचे आमदार डॉ राहुल आहेर, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, ग्रामीण पोलिस अधीक्षक पाटील , तसेच इतर विभागाचे प्रमुख अधिकारी व णमोकार तीर्थक्षेत्र येथील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी येणाऱ्या पुढील तीन महिन्यांमध्ये भौतिक सुख सुविधा तात्काळ पूर्ण करण्यात याव्यात तसेच या जैन कुंभमेळासाठी जो आराखडा तयार करण्यात आलेला आहे तो जिल्हाधिकारी व आयुक्त यांच्या माध्यमातून शासनाकडे सादर करण्यात यावा त्यास तात्काळ मान्यता देण्यात येईल असे मुख्यमंत्री व इतर मंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सांगण्यात आले.
जैन णमोकार तीर्थक्षेत्र मालसाने येथे सकल जैन समाजाचा कुंभमेळा दिनांक 6 फेब्रुवारी 2026 ते 13 फेब्रुवारी 2026 रोजी होत आहे. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक प्रतिष्ठा तथा महामस्तकाभिषेक चा कार्यक्रम होणार आहे. यासाठी 400 हून अधिक साधू महंत व दहा लाख पेक्षा जास्त भाविक येणार असल्याचा अंदाज आहे.
त्या निमित्ताने या कार्यक्रमासाठी णमोकार तीर्थक्षेत्र येथील भौतिक सुख सुविधांचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगण्यात आले व त्यानुसार पुढील बैठक व आराखड्यास मान्यता देण्याबाबत चे आश्वासन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व इतर विभागाचे मंत्री यांनी सांगितले. याबाबतची माहिती चांदवड देवळा विधानसभेचे आमदार डॉ.राहुल आहेर व चांदवड चे प्रथम नगराध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस भूषण कासलीवाल यांनी माहिती दिली.
