नाशिक कुंभमेळ्यासाठी रिंग रोडची मान्यता
उत्तन विरार सागरी सेतू प्रकल्प जोडरस्त्याने वाढवण बंदरापर्यंत विस्तारास मान्यता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे ‘मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समिती’ची बैठक पार पडली.
मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्ग, एस.व्ही.रोड आणि लिंक रोड या प्रमुख मार्गांवर क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक असल्याने परिणामी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नरिमन पाईंट ते विरारपर्यंत विविध पायाभूत सुविधांचा विस्तार आणि सुधारणा करण्यात येत आहे. याचबरोबर उत्तर-दक्षिण जोडणी करत 24.35 किमी लांबीचा उत्तन-विरार सागरी सेतू बांधण्यात येणार असून तो पुढे वाढवण बंदरापर्यंत नेण्यासाठी जोडरस्ता तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्पाची लांबी 55.12 किमी असून, मुख्य सागरी सेतू 24.35 किमी लांबीचा असणार आहे. या प्रकल्पात 9.32 किमी लांबीचा उत्तन जोडरस्ता, 2.5 किमीचा वसई जोडरस्ता आणि 18.95 किमीचा विरार जोडरस्ता तयार करण्यात येणार असून आता तो वाढवण बंदरापर्यंत वाढविण्यासाठी यावेळी निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील उत्तर-दक्षिण रस्ता जोडणीचे काम सुरू असून आरेंज गेट बोगदा, वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू, उत्तर किनारी मार्ग, दिल्ली मुंबई महामार्ग, शिवडी-वरळी उन्नत रस्ता प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. त्याचबरोबर उत्तन विरार सागरी सेतू आणि विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका तयार करण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे मुंबईतील प्रवास अखंड होणार असून वाहतुकीत मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
नाशिक येथे आगामी होणाऱ्या कुंभमेळ्यानिमित्त रिंग रोडसह आंतर रिंग उभारणे आवश्यक आहे. या रिंग रोडमुळे नाशिक कुंभमेळ्याकरिता सात मार्गाने येणाऱ्या भाविकांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या रिंग रस्त्यांची कामे मार्च-जून 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर नाशिक येथे 66 किमीचा आंतर रिंग रोड उभारण्यास आज मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर या रस्त्यांकरिता लागणाऱ्या आवश्यक भूसंपादनासही मान्यता देण्यात आली असून यासाठी लागणारा खर्च नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणामार्फत केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी पुण्यातील मेट्रो ही 6 कोचची करून हे सर्व प्रकल्प 3 वर्षात पूर्ण होतील असे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच पुण्यात मेट्रोचे जाळे तयार करण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. पुणे चिंचवड महानगरपालिका ते निगडी हे 4.4 किमी लांबीचे इलेव्हेटेड मेट्रोचे काम हाती घेण्यात आले असून हा प्रकल्प जानेवारी 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे. स्वारगेट ते कात्रज ही अंडरग्राऊंड मेट्रो मार्च 2029 पर्यंत पूर्ण होणार आहे. वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी हा कॉरिडोर जुलै 2029 पर्यंत पूर्ण होणार आहे. पुणे मेट्रो लाईन 3 चे काम लवकर पूर्ण करून खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला या प्रकल्पासाठी तात्काळ भूसंपादनाची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
हडपसर-लोणी काळभोर कॉरिडोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड कॉरिडोर तयार करताना बोगद्याद्वारे हा मार्ग पुरंदर एअरपोर्टपर्यंत नेण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्या. त्याचबरोबर पुरंदर एअरपोर्ट येथे जाण्यासाठी रस्ते तसेच मेट्रोचे नियोजन करण्याचे निर्देश देत मल्टीलेव्हल इंटिग्रेशन करून मोठ्या प्रमाणात पार्कींग सुविधा निर्माण करण्याचेही निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
