प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिनाऱ्यांना धोका ! संशोधनातून आली धक्कादायक माहिती समोर…

तुमच्यापैकी बरेच जण ऑफिस, वर्कआऊटला जाताना प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी घेऊन जात असतील. इतकेच नाही तर शाळा, कॉलेजमध्ये जाणारी मुलंही पाणी पिण्यासाठी विविध स्टाइलच्या प्लास्टिकच्या बाटल्या वापरतात. पण, प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे तुमच्या ह्रदयासाठी धोकादायक ठरत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. इतकेच नाही तर क्लिंग फिल्ममध्ये गुंडाळलेल्या भाज्या, ऑनलाइन मागवलेले मासेदेखील तुमच्या ह्रदयासाठी हानिकारक ठरत असल्याचे संशोधनातून उघड झाले आहे.प्लास्टिक निसर्ग आणि आरोग्य या दोन्हींसाठी हानिकारक आहे. प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी प्यायल्याने शरीराला अनेक आजार होऊ शकतात. प्लास्टिकची बाटली किंवा क्लिंग फिल्ममधील मायक्रोप्लास्टिक्स तुमच्या रक्तप्रवाहात तरंगते, ज्यामुळे ह्रदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका ४.५ पटीने वाढू शकतो, असेही या संशोधनातून समोर आले आहे.

इटलीच्या कॅम्पानिया विद्यापीठाच्या एका नवीन अभ्यासात आणि न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन (NEJM) मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात, व्यक्तींच्या धमन्यांमध्ये मायक्रोप्लास्टिक आढळून आले आहे. पाच मिलिमीटरपेक्षा कमी असेही प्लास्टिकचे तुकडे सापडले आहेत. डॉक्टरांनी ३०४ रुग्णांच्या धमन्यांमध्ये चरबी जमा होण्याचे प्रमाण तपासले, यावेळी ३०४ रुग्णांपैकी ५० टक्क्यांहून अधिक रुग्णांच्या रक्तात मायक्रोप्लास्टिक्स आढळले. हे मायक्रोप्लास्टिक्स व्यक्तीच्या कॅरोटीड धमन्यांमध्ये आणि मुख्य रक्तवाहिन्यांत जमा होते; ज्यातून मान, चेहरा आणि मेंदूला रक्त पुरवठा होतो. इतकेच नाही तर या मायक्रोप्लास्टिक्समुळे तीन वर्षांत ब्लॉकेज आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

नॅक्सिन कियाम आणि त्यांच्या टीमच्या संशोधनानुसार, बाहेर विकल्या जाणाऱ्या पाण्याच्या एक लिटरच्या काही बाटल्यांमध्ये ३ लाख ७० हजार मायक्रो प्लॅस्टिक पार्टिकल्स आढळून आले आहेत. यात सरासरी आकडेवारी पाहिली, तर २ लाख ४० हजार नॅनो पार्टिकल्स दिसून आले. आधी झालेल्या अभ्यासाच्या तुलनेत हा आकडा खूप जास्त आहे.

निष्कर्ष महत्त्वपूर्ण आहेत, कारण यातून स्पष्ट झाले की, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान, लठ्ठपणा आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी मायक्रोप्लास्टिक हे अतिरिक्त जोखीम घटक आहेत. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे आपण खात असलेल्या प्रत्येक गोष्टीमधून नकळतपणे मायक्रोप्लास्टिक आपल्या शरीरात जात आहे.

मायक्रोप्लास्टिकमुळे शरीरावर काय परिणाम होतात…?
एकदा का मायक्रोप्लास्टिक्स तुमच्या धमन्यांमध्ये गेले की, तेव्हा ते रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करण्यास सुरुवात करते. यामुळे दीर्घकाळ जळजळ होऊ शकते, ज्यामुळे कालांतराने रक्तवाहिन्यांच्या अस्तरांना नुकसान होते. यामुळे डोळ्यातून पाणी येऊ शकते, ह्रदयात ब्लॉकेज निर्माण होऊ शकतात. धमन्या संकुचित होतात. रक्त प्रवाहात अडथळा निर्माण होतो आणि ठराविक कालावधीनंतर हृदयविकाराच्या झटक्याचाही धोका संभवतो.

प्राण्यांवर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, शरीरात जमा झालेल्या मायक्रोप्लास्टिक्समुळे हृदयाच्या गतीत बदल होतो. यामुळे हृदयाच्या कार्यात अडथळा निर्माण होऊ शकतो.

अलीकडील अभ्यासानुसार, एक लिटर प्लास्टिकच्या बाटलीत सात प्रकारच्या प्लास्टिकचे सरासरी २,४०,००० कण असतात. अशाप्रकारे २० लिटर पाण्याच्या कॅनमध्ये किती असतील, याचा विचार करा.

मायक्रोप्लास्टिक्स आपल्या शरीरात किती सहज प्रवेश करू शकतात…?
जेव्हा आपण क्लिंग फिल्ममध्ये गुंडाळलेली फळे आणि भाज्या खातो आणि प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पितो, तेव्हा आपण नकळतपणे अनेकदा मायक्रोप्लास्टिक्स गिळत असतो. मायक्रोप्लास्टिक्स शरीरात पोहचवण्याचा पाणी हा सर्वात सोपा वाहक आहे. कारण ते गिळल्यानंतर पोटात जाते, यावेळी प्रक्रियेत त्याचे आणखी तुकडे होतात. याशिवाय सरोवरे, नद्या आणि समुद्रातील मासे, विशेषत: शेलफिश प्लास्टिक खातात, यानंतर जेव्हा आपण हेच मासे शिजवून खातो तेव्हा नकळतपणे प्लास्टिक आपल्या शरीरात जाते. अशाप्रकारे नकळतपणे आपण चुकून रोज प्लास्टिक गिळतो.

पत्रकार -

Translate »