छत्रपती संभाजीनगर : लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम टप्प्या-टप्प्याने वाढविणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
छत्रपती संभाजीनगर, दि.६ :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही नेहमी सुरु रहावी यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आली असून ही योजना बंद तर पडणार नाहीच उलट लाभाची रक्कम ही टप्प्या टप्प्याने वाढविण्यात येईल,असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे आपल्या लाडक्या बहिणींना दिला.
छत्रपती संभाजीनगर येथे खडकेश्वर परिसरात मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान’ आणि राज्यस्तरीय विविध योजनांचा लोकार्पण सोहळा पार पडला.
लाडकी बहिण योजनेचे पंतप्रधानांकडून कौतुक
महिलांना आर्थिक सक्षम करण्याच्या दिशेने एक पाऊल उचलत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, अडीच लाख महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेमुळे महिलांना स्वतःचे छोटे-छोटे व्यवसाय सुरू करण्यास मदत झाली आहे आणि त्या आर्थिक स्वावलंबी बनत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी या योजनेला कायमस्वरूपी स्वरूप देण्याचे आश्वासन दिले आहे आणि भविष्यात या योजनेतून मिळणारी रक्कम वाढवण्याचीही शक्यता आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनीही या योजनेचे कौतुक केले आहे.
शासनाच्या योजनांमुळे सर्वसामान्यांना आधार
प्रधानमंत्री मोदी यांनी ठाणे आणि मुंबईतल्या ३३ हजार कोटींपेक्षा जास्तीच्या प्रकल्पांची पायाभरणी केली आहे. शेंद्राच्या ऑरिक सिटीचं नाव तर जगभर गाजायला सुरुवात झाली आहे. टोयाटो किर्लोस्करचा २० हजार कोटींचा प्रकल्प तिथे होत आहे. लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुलीसाठी मोफत उच्च शिक्षण योजना, शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना अशा अनेक योजना सर्वसामान्यांना आधार देणाऱ्या ठरल्या असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
महिलांना विकासाच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना उपयुक्त- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशाला विकासाकडे नेण्यासाठी महिलांना विकासाच्या केंद्रस्थानी आणणे आवश्यक आहे, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणतात. त्यानुसार महिलांना विकासाच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना उपयुक्त ठरत आहे. केंद्र शासनाने महिलांसाठी बेटी बचाओ, बेटी पढाओपासून ते लखपती दीदी सारख्या विविध योजना हाती घेतल्या आहेत. त्यानुसार राज्य शासनामार्फत लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे. लेक लाडकी योजनेतून मुलीच्या जन्मानंतर तिच्या बँक खात्यावर टप्प्या-टप्प्याने एक लाख रुपये जमा केले जात आहेत. महिलांना एसटी बस प्रवासात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा दीड हजार रुपये दिले जात आहेत. ही योजना बंद होणार असलाचा अपप्रचार काही लोकांकडून केला जात आहे, मात्र यापुढेही ही योजना अशीच सुरु राहील, असा विश्वास श्री. फडणवीस यांनी दिला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पुरेशा निधीची तरतूद- उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दिवाळीपूर्वीच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांची रक्कम मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’ आणि ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ या दोन्ही योजना यशस्वीपणे राबविल्या जात आहेत. या योजनांमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होणार आहे आणि त्यांचे उत्पन्न वाढेल.
राज्यात एकही घटक लाभापासून वंचित राहणार नाही-महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पाच महिन्यांचा लाभ वितरीत करण्यात यश आले आहे. २ कोटी २२ लाख महिलांपर्यंत हा लाभ पोचला आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचा लाभही लवकरच जमा होईल. महिलांसाठी पिंक रिक्षा योजना आणली असून राज्यात १० हजार रिक्षा देण्यात येत आहेत. महानगर क्षेत्रात ५०० ते १ हजार रिक्षा देण्यात येत आहेत. पुढे हेच उदिष्ट २ हजारापर्यंत वाढविण्यात येणार आहे. राज्यात एकही घटक लाभापासून वंचित राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. विविध योजनांचे लोकार्पण मान्यवरांचा हस्ते करण्यात आले. यामध्ये मोफत वीज बील योजना, मागेल त्याला सौर कृषि पंप योजना, पिंक ई रिक्षाचे लोकार्पण करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर विभागातील चांगल्या कार्याबद्दल विभागीय आयुक्त् दिलीप गावडे यांच्यासह जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस विभाग यांचा गौरव करण्यात आला. यावेळी महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.