कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार):आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जनजागृती कार्यक्र माचे आयोजन
मानव–बिबट संघर्ष, सर्पांविषयी जनजागृती व प्राथमिक उपचारांचे प्रात्यक्षिक.
चांदवड-देवळामतदार संघाचे आमदार डॉ राहुल आहेर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मानव–बिबट संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना व सहजीवनाची गरज अधोरेखित करताना तसेच सर्पांविषयी योग्य माहिती व सर्पदंशाच्या प्रसंगी करावयाच्या प्राथमिक उपचारांची जनजागृती करण्यासाठी उर्धुळ तालुका चांदवड येथे माऊली बहुउद्देशीय संस्थेचे संचालक मंडल व शालेय व्यावस्थापन समिती यांनी उर्धुळ येथील सभा मंडपात नागरिक व संत ज्ञानेश्वर विद्यालय उर्धुळ तसेच जिल्हापरिषद शाळा उर्धुळ विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले.
नाशिक पूर्व वन विभागाचे चांदवड वनपरिक्षेत्र कार्यालय व ए आर इ ए एस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मानव बिबट सहजीवन व शून्य सर्पदंश जनजागृती अभियान कार्यक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमात ए आर इ ए एस फाउंडेशन चे संचालक व वन्यजीव अभ्यासक सुशांत रणशूर व चांदवड वनरक्षक सुरेखा मरशिवने हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते.
वनरक्षक सुरेखा मरशिवने यांनी विद्यार्थ्यांना बिबट्यांच्या नैसर्गिक वावरामागील कारणे, त्यांचे निवासस्थान, हालचालीचे मार्ग व मानव–बिबट संघर्ष वाढण्याची कारणे याबाबत सविस्तर माहिती दिली. तर सुशांत रणशूर यांनी विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना ग्रामीण व डोंगराळ भागातील नागरिकांनी सुरक्षित वर्तनाची पद्धती अवलंबून अशा घटना कशा टाळता येतील, याबाबत महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या.वाघ, तरस आणि बिबट यांच्यातील फरक स्पष्ट करून सांगितला.मानव बिबट सहजीवन तसेच अन्न साखळी चे महत्व बाबत शास्त्रीय माहिती दिली तसेच विविध जातींच्या सर्पांची शास्त्रीय ओळख करून दिली. त्यांनी विषारी व बिनविषारी सर्पांमधील फरक, त्यांचे वर्तन, तसेच सर्पदंश झाल्यास घ्यावयाची योग्य पावले याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले. यामध्ये सर्पदंशानंतर घ्यावयाची तातडीची खबरदारी, चुकीच्या उपचारपद्धतींचे दुष्परिणाम आणि रुग्णालयापर्यंत सुरक्षितपणे पोहोचविण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.रणशूर यांच्या सोबत आलेले सहकारी व ए आर इ ए एस फाउंडेशन सदस्य देविदास सताळे यांनी त्यांना सहकार्य केले.
या मार्गदर्शन सत्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीवांविषयी जागरूकता, संरक्षणाची भावना आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य प्रतिसाद देण्याची क्षमता विकसित झाली. कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



