शेतकऱ्यांना दिलासा! अखेर अतिवृष्टीची मदत जाहीर, ‘या’ १८ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार मदत निधी..

राज्य सरकारने अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात, २० सप्टेंबर रोजी राज्य सरकारने तीन शासन निर्णय जाहीर केले. या निर्णयानुसार, एकूण १८ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मदत निधी देण्यात येणार आहे. या जिल्ह्यांमध्ये यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपुर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, गोंदिया, लातूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांचा समावेश आहे.

जून ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी, राज्य सरकारने २३ कोटी ७२ लाख ९३ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी गोंदिया, पुणे, लातूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना वितरीत केला जाणार आहे. राज्य सरकारने हा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी पद्धतीने जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.

या निर्णयानुसार, शेतकऱ्यांना त्यांच्या जिरायत, बागायत आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी नवीन दरानुसार मदत देण्यात येणार आहे. हा निर्णय १ जानेवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ३ हेक्टर क्षेत्रफळासाठी ही मदत मिळेल. मात्र, अनेक शेतकऱ्यांनी यापूर्वी तक्रार केली होती की त्यांना फक्त २ हेक्टर क्षेत्रफळासाठी आणि जुने दरानुसारच मदत मिळाली आहे. या निधीचे वाटप खालीलप्रमाणे करण्यात आले आहे: नागपूर विभागासाठी ८ कोटी, पुणे विभागासाठी २ कोटी, छत्रपती संभाजीनगर विभागासाठी ३ कोटी, नाशिक विभागासाठी ७ कोटी आणि कोकण विभागासाठी ३ कोटी रुपये.

मार्च ते मे २०२४ या कालावधीत चंद्रपुर, पुणे, सातारा, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके मोठ्या प्रमाणावर नष्ट झाली. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी राज्य सरकारने ४४ कोटी ७४ लाख २५ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यापैकी नागपूर विभागासाठी २ कोटी आणि पुणे विभागासाठी ४२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

ऑगस्टच्या शेवटी आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या भागाची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले. कृषिमंत्री मुंडे यांनी शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळेल असे सांगितले. मात्र, अजूनपर्यंत याबाबत कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही.

पत्रकार -

Translate »