Nashik: पिंपळगाव बाजारात टोमॅटोचा धडाका ! दररोज 20 कोटींची उलाढाल ; चांगल्या भावामुळे विक्रीस पसंती..
पिंपळगाव बसवंत :पिंपळगाव बसवंत बाजार समिती सध्या टोमॅटोच्या व्यापारात आघाडीची भूमिका बजावत आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात दररोज दोन लाख क्रेट टोमॅटोची आवक येथे होत असल्याने पिंपळगाव हे टोमॅटो व्यापाराचे केंद्र बनले आहे. देशातील विविध राज्यांसह बांगलादेशातही पिंपळगावचा टोमॅटोचा पुरवठा होत आहे. वीस वर्षांनंतर टोमॅटोला इतका चांगला भाव मिळत आहे. एका क्रेट (वीस किलो) टोमॅटोला सरासरी बाराशे रुपये मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक आणि बाजार समिती, दोन्ही आर्थिकदृष्ट्या फायद्यात आहेत. टोमॅटोच्या खरेदी-विक्रीतून दररोज वीस कोटी रुपयांची उलाढाल होत असून यामुळे बाजार समितीची आर्थिक स्थितीही मजबूत झाली आहे.
पिंपळगाव बसवंत बाजार समिती आशिया खंडात टोमॅटोच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र बनली आहे. बेंगळुरू, गुजरात, नारायणगाव येथील टोमॅटोचा हंगाम आधीच संपला असताना, नाशिक जिल्ह्यात टोमॅटोची चांगली पिके घेतली जात आहेत. शेतकरी चोख वजन आणि रोख पैसे मिळण्याच्या आशेने आपले टोमॅटो पिंपळगाव बाजार समितीत विक्रीसाठी आणतात. त्यामुळे दुपारनंतर बाजार समितीत शेतकऱ्यांच्या वाहनांची गर्दी असते. दररोज तीन हजार वाहनांमध्ये दोन लाख क्रेट टोमॅटो विक्रीसाठी आणले जातात. इतक्या मोठ्या प्रमाणात उत्पादन असूनही उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार आणि बांगलादेशातून टोमॅटोची मागणी आहे. परराज्यातील सुमारे दोनशे व्यापारी या बाजार समितीत टोमॅटो खरेदीसाठी येतात.
दररोज दोन लाख क्रेट टोमॅटोची आवक आणि प्रत्येक क्रेटला मिळणारा सरासरी बाराशे रुपये भाव यामुळे पिंपळगाव बाजार समितीत दररोज वीस कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. आडतदार शेतकऱ्यांना ताबडतोब पैसे देण्याचा प्रयत्न करतात. बँका सुट्ट्या असल्याचे काही अपवाद वगळता, आडतदारांकडून तात्काळ पेमेंट मिळते.
शेतकऱ्यांना जर आडतदारांबाबत कोणतीही तक्रार असली तर सभापती दिलीप बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे प्रश्न सोडवले जातात. सोन्याप्रमाणे टोमॅटोचे दर चढले असल्याने टोमॅटो उत्पादक यंदा खूप नफा कमवत आहेत. यामुळे बाजार समितीला दररोज वीस लाख रुपये बाजार शुल्क म्हणून मिळत आहे.