या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे खरीप लाल कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले. याचा परिणाम म्हणून दसऱ्याच्या सणावर जिल्ह्यातील बाजारपेठेत लाल कांद्याची आवक दरवर्षीच्या तुलनेत कमी झाल्याचे दिसून आले.

खारीपाटा (उमराणे) येथील रामेश्वर कृषी बाजारात दसऱ्याच्या सणाला लाल कांद्याला प्रतिक्विंटल ७१०० रुपये इतका विक्रमी भाव मिळाला. सुरुवातीला पावसामुळे कांदा पिकांची वाढ खूपच मंदावली होती. त्यानंतर कांदा काढण्याच्या वेळी पुन्हा जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. अशा परिस्थितीतही दसऱ्याच्या सणाला बाजारात कांदा आला. देवळा तालुक्यातील महात्मा फुले नगर येथील रामेश्वर कृषी बाजारात सुमारे १३०० क्विंटल कांदा आला.

प्रकाश कांतीलाल ओस्तवाल यांच्या हस्ते लिलावाची सुरुवात झाली. राज ट्रेडर्स संचालक संतोष बाफना यांनी लिलावात सर्वाधिक ७१०० रुपये प्रति क्विंटल दराने किसन झिपा राठोड (रा. उमराणे) यांचा लाल कांदा खरेदी केला. या लिलावात कांद्याला किमान ५०० ते कमाल ७१०० रुपये आणि सरासरी ४००० रुपये दर मिळाला. यावेळी नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे, बाजार समितीचे माजी सभापती राजू देवरे, श्री रामेश्वर कृषी मार्केटचे मुख्य संचालक श्रीपाल प्रकाश ओस्तवाल, पुंडलिक देवरे आदींसह कांदा व्यापारी, बाजार समितीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

चांदवडला लाल कांदा दाखल

चांदवड बाजार समितीत सध्या उन्हाळ आणि लाल कांदा विक्रीसाठी आला आहे. यापैकी उन्हाळ कांद्याचा भाव २२०३ ते ४४०० रुपये, तर उन्हाळ (गोल्टा/गोल्टी) कांद्याचा भाव ३८६० रुपये आणि लाल कांद्याचा भाव ५७६ ते १५८१ रुपये प्रति क्विंटल असा आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची विक्री करून मिळालेली रक्कम त्याच दिवशी रोख स्वरूपात घ्यावी. जर रोख रक्कम मिळाली नाही तर २४ तासांच्या आत बाजार समितीच्या कार्यालयात संपर्क साधावा. २४ तासांनंतर याबाबतची कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही, असे बाजार समितीचे सभापती संजय जाधव, उपसभापती डॉ. वैशाली जाधव आणि सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे यांनी स्पष्ट केले आहे.

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »