Onion: पावसामुळे कांदा पिकावर जांभळा करपा किंवा पीळ रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता,असे करा व्यवस्थापन..
अनेक भागांमध्ये कांदा पिकाचे नुकसान झाले असून, जांभळा करपा आणि पीळ रोग येण्याची शक्यता असल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.
सध्या रब्बी हंगामातील कांदा पिकासाठी प्रथम रोपे तयार करण्यासाठी कांदा बियाणे टाकण्याचे काम सुरू आहे. डिसेंबर महिन्यात कांदा लागवड केली जाते. नवरात्रोत्सवातील एक ते नऊ माळीचा कालावधी हा कांदा बियाणे टाकण्यासाठी उपयुक्त मानला जातो. जर कांदा बियाणे योग्य वेळेत टाकले गेले, तर डिसेंबरमध्ये लागवड होऊन पिकाला पूर्णतः थंडी मिळते, ज्यामुळे पिक चांगले येण्याची शक्यता अधिक असते.
कांदा बियाणे (उळे) टाकण्यास विलंब झाल्यास शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो, अशी चिंता शेतकरी वर्गाने व्यक्त केली आहे. प्रमुख अडचणींमध्ये जमिनीत साचलेले पाणी बाष्पीभवन होण्यास विलंब होणे, ओलसरपणामुळे जमिनीत बुरशी तयार होणे, आणि यामुळे बीज उगवण्यात अडचण येऊन रोपांवर मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. या समस्यांमुळे हंगाम वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे, त्यामुळे योग्य वेळी बियाणे टाकणे अत्यावश्यक असल्याचे शेतकरी मंडळींकडून सांगण्यात येत आहे.
परतीच्या पावसामुळे कांदा पिकावर जांभळा करपा किंवा पीळ रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यासाठी शेतकऱ्यांनी योग्य व्यवस्थापन करण्यासाठी आलटून पालटून बुरशीनाशकांची फवारणी करावी, असा सल्ला मालेगाव केव्हीकेचे पिक संरक्षण तज्ञ विशाल चौधरी यांनी दिला आहे.
फवारणीसाठी झेड-७८ १.५ ग्रॅम/लिटर किंवा फोलिक्यूअर १ मिली/लिटर किंवा बेनलेट १ ग्रॅम/लिटर हे बुरशीनाशक वापरावेत. यासोबतच विद्राव्य खत १३:००:४५ (७५ ग्रॅम/पंप) प्रमाणात घेऊन फवारणी करावी. या उपाययोजनांमुळे कांदा पिकाच्या संरक्षणात मदत होईल.