शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज! बांगलादेशाने कांदा आयात शुल्क हटवले; दरात वाढ होण्याची शक्यता, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा

बांगलादेशाने कांदा आयातीवरील बंधन शिथिल केल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
अखेर बांगलादेश सरकारने भारतीय कांद्यावरील आयात शुल्क हटवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे भारतातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे भारतीय शेतकऱ्यांना त्यांची कांदा उत्पादने थेट बांगलादेशात निर्यात करता येणार आहेत, आणि त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारभाव मिळू शकेल. बांगलादेशच्या राष्ट्रीय महसूल मंडळाने (NBR) कांद्यावरील आयातीवरील सीमाशुल्क आणि नियामक शुल्क पूर्णपणे मागे घेतल्याचे जाहीर केले आहे.

भारतीय कांदा निर्यातीला चालना देण्यासाठी निर्णय

गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशने कांद्यावर आयात शुल्क लागू केले होते, ज्यामुळे भारतीय कांद्याची निर्यात मंदावली होती आणि भारतातील कांदा उत्पादकांना त्यांच्या उत्पादनांसाठी योग्य बाजारभाव मिळत नव्हता. या शुल्कामुळे भारतीय शेतकरी अडचणीत होते कारण कांद्याची किंमत सतत घसरत होती आणि त्यांचा नफा कमी होत होता. तथापि, आता आयात शुल्क हटवल्याने भारतीय शेतकऱ्यांना त्यांचा कांदा निर्यात करून फायदा मिळू शकतो.

किमतीवर नियंत्रणासाठी निर्णय

बांगलादेशच्या राष्ट्रीय महसूल मंडळाचे अध्यक्ष मोहम्मद अब्दुर रहमान खान यांनी बुधवारी स्वाक्षरी केलेल्या पत्राद्वारे हे आदेश जारी केले. १५ जानेवारी २०२५ पर्यंत हे आयात शुल्क हटवले जाणार असल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे. बांगलादेश सरकारने हे पाऊल स्वयंपाकघरातील जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी उचलले आहे, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा निर्णय मोठा दिलासा देणारा ठरला आहे.

बांगलादेशच्या व्यापार आयोगाचा प्रस्ताव आणि पुढील धोरण

यापूर्वी, ३१ ऑक्टोबर रोजी बांगलादेश व्यापार आणि शुल्क आयोगाने कांद्याच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्याच्या ५ टक्के सीमाशुल्क पूर्णपणे मागे घेण्याचा प्रस्ताव दिला होता. अध्यक्षांच्या मते, या निर्णयामुळे भारतातील कांदा उत्पादकांना बांगलादेशातील मोठ्या बाजारपेठेत कांदा विक्री करण्याची संधी मिळणार आहे.

शेतकऱ्यांसाठी दिलासा; कांदा किमतींमध्ये स्थिरता येण्याची शक्यता

या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि भारतीय व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भारतीय कांद्याच्या निर्यातीला चालना मिळाल्याने देशांतर्गत बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठ्याच्या परिस्थितीतही सुधारणा होण्याची शक्यता आहे.

बांगलादेश सरकारने कांद्यावरील आयात शुल्क हटवल्यामुळे भारतीय कांदा उत्पादकांना येत्या काळात चांगला भाव मिळण्याची अपेक्षा आहे. बांगलादेश आता भारतातून अधिक प्रमाणात कांदा आयात करणार असल्याने भारतीय शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबरच कांदा व्यापाऱ्यांनाही मोठा फायदा होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

पत्रकार -

You may have missed

Translate »