Onion Garlic Price Hike : बाजारात कांद्याने गाठली शंभरी, लसणाच्या दरातही विक्रमी वाढ..

यंदाच्या हंगामात हवामानातील अनियमिततेमुळे कांद्याचे उत्पादन कमी झाले आहे. विशेषतः नाशिक आणि इतर कांदा उत्पादन क्षेत्रांमध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारात येणाऱ्या नव्या कांद्याची गती संथ झाली आहे, ज्याचा थेट परिणाम दरांवर झाला आहे.

लसणाच्या दरवाढीमागे प्रमुख कारण म्हणजे नाशिक व इतर ठिकाणांहून येणाऱ्या नवीन मालात झालेला उशीर. त्यातच अफगाणिस्तानातून आयात केलेल्या लसणाच्या उच्च किमतीही ग्राहकांना परिणामकारक ठरत आहेत.

कांदा आणि लसूण हे भारतीय स्वयंपाकघरातील महत्त्वाचे घटक आहेत. मात्र, सध्या या आवश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. किरकोळ बाजारात दोन आठवड्यांपूर्वी ३५-४० रुपये प्रति किलो दराने मिळणारा बटाटा आता ५० ते ६० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे, कांद्यानेही शंभर रुपयांचा आकडा पार केला आहे.

कांद्याच्या किंमतीत सतत चढ-उतार

मुंबईतील किरकोळ बाजारात कांद्याचे दर पावसाळ्यापासून ३५ ते ४० रुपये किलोदरम्यान स्थिर होते. मात्र मागील काही दिवसांत कांद्याच्या दरात अचानक वाढ झाली आहे. सध्या कांदा दक्षिण मुंबईत १०० ते ११० रुपये, दादर परिसरात ८० ते ९० रुपये, मध्य उपनगरात ८० रुपये तर उत्तर उपनगरात ६० ते ८० रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. पूर्व उपनगरात कांद्याची किंमत ७० ते १०० रुपये किलोदरम्यान आहे.

मागणी वाढल्यामुळे दरवाढ

मुंबईत थंडी सुरू झाल्याने तिखट आणि चटकदार पदार्थांची मागणी वाढली आहे. हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमधील वाढती मागणीही यामागील एक प्रमुख कारण ठरत आहे. या क्षेत्राकडून कांद्याची मागणी १५-२० टक्क्यांनी वाढल्याचे भाजी विक्रेते सांगतात. पवईतील विक्रेते अजय शिकेरकर यांनी सांगितले की, “दोन आठवड्यांपूर्वी ७०-८० रुपये किलो दराने मिळणारा कांदा आता १०० रुपये किलोच्या घरात गेला आहे.

लसणाच्या किंमतीत वाढ

पावसाळ्यादरम्यान ६०-७० रुपये प्रति पाव किलो असलेला लसूण सध्या १५० रुपये प्रति पाव किलोवर पोहोचला आहे. नवरात्रातील उपवास संपल्यानंतर लसणाच्या किंमतीत झपाट्याने वाढ झाली आहे. अफगाणिस्तानातून आयात केलेला लसूण ५०० रुपये किलो दराने विकला जात आहे. नाशिकमधून येणाऱ्या लसणाच्या नवीन मालात विलंब झाल्याने हा तुटवडा निर्माण झाला आहे.

दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान कांद्याच्या किंमतीत किंचित वाढ होते. दिवाळीनंतर नवीन कांदा बाजारात आल्यावर दर कमी होतात. मात्र यंदा नवीन कांद्याचा पुरवठा कमी असल्याने मागणी आणि पुरवठ्याचा समतोल बिघडला आहे. बाजारात एकूण मागणीच्या फक्त ८० टक्के कांदाच उपलब्ध आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, यंदाच्या पावसाने उत्पादनावर विपरित परिणाम केला आहे. दुसरीकडे, व्यापारी सांगतात की, साठेबाजी आणि आयातीवरील विसंबून असल्याने दरवाढ अटळ आहे.

पत्रकार -

Translate »