महावितरणकडून ‘गो ग्रीन’ सेवा: नववर्षाच्या सुरुवातीला ग्राहकांसाठी मोठी भेट, वीजबिलात ‘इतक्या’ रुपयांची मिळणार सूट

सांगली: नववर्षाच्या सुरुवातीला महावितरणने (Mahavitaran) आपल्या ग्राहकांसाठी एक मोठी भेट जाहीर केली आहे. पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘गो ग्रीन’ (Go-Green) सेवेसाठी नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना मासिक वीज बिलामध्ये १० रुपयांची सवलत मिळत असे. मात्र, आता महावितरणने या योजनेत सुधारणा करत पहिल्याच वीज बिलामध्ये १२० रुपयांची एकरकमी सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.

‘कागद वाचवा, पर्यावरण वाचवा’ अभियान

महावितरणने पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत ‘कागद वाचवा, पर्यावरण वाचवा’ या संकल्पनेनुसार ‘गो ग्रीन’ सेवा सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत ग्राहकांना छापील वीज बिलाच्या जागी ईमेलद्वारे वीज बिल पाठवले जाते. यामुळे छापील कागदाचा वापर कमी होतो आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते.

पहिल्या बिलात एकरकमी सवलत

यापूर्वी ‘गो ग्रीन’ सेवेचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना मासिक वीज बिलामध्ये १० रुपयांची सवलत देण्यात येत होती. मात्र, आता महावितरणने या योजनेत मोठा बदल केला आहे. ‘गो ग्रीन’ सेवा निवडणाऱ्या ग्राहकांना पहिल्याच वीज बिलामध्ये १२० रुपयांची एकरकमी सवलत मिळणार आहे. ही सवलत पुढील १२ महिन्यांसाठी ग्राह्य धरली जाईल, म्हणजेच मासिक सवलतीचे एकरकमी स्वरूप ग्राहकांना पहिल्याच महिन्यात मिळणार आहे.

किती ग्राहकांचा सहभाग?

महावितरणच्या तब्बल ३ कोटी लघुदाब ग्राहकांपैकी सध्या केवळ ४.६२ लाख म्हणजेच १.१५ टक्के ग्राहकांनी ‘गो ग्रीन’ सेवा निवडली आहे. हे प्रमाण वाढावे, यासाठी महावितरणकडून प्रयत्न सुरू आहेत. भविष्यात अधिकाधिक ग्राहकांनी या पर्यायाचा अवलंब करावा, यासाठी वीज बिलात तत्काळ १२० रुपयांची सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गो ग्रीन सेवेसाठी कशी नोंदणी करावी?

‘गो ग्रीन’ सेवेसाठी नोंदणी प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. महावितरणकडून सर्व वीज ग्राहकांना एसएमएस पाठवून या योजनेची माहिती देण्यात येणार आहे. ग्राहकांना www.mahadiscom.in या संकेतस्थळाला भेट देऊन ‘गो ग्रीन’ पर्याय निवडावा लागेल. एकदा नोंदणी केल्यानंतर, नोंदणीकृत ईमेलवर वीज बिल पाठवले जाईल आणि ग्राहकांना मासिक सवलतीचा लाभ मिळेल.

ग्राहकांसाठी फायद्याचे पाऊल

महावितरणच्या या निर्णयामुळे ग्राहकांना आर्थिक फायद्यासोबतच पर्यावरण संरक्षणातही योगदान देता येणार आहे. छापील कागदाचा वापर कमी झाल्यामुळे झाडांची कत्तल टळणार आहे आणि पर्यावरणाचा समतोल राखला जाणार आहे.

महावितरणची ‘गो ग्रीन’ सेवा ही केवळ पर्यावरण संवर्धनासाठी नसून, ग्राहकांच्या फायद्यासाठीही महत्त्वाची ठरत आहे. नववर्षाच्या सुरुवातीला जाहीर झालेली १२० रुपयांची सवलत ही ग्राहकांसाठी आर्थिकदृष्ट्या फायद्याची असून, भविष्यात या योजनेचा अधिकाधिक ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. ‘गो ग्रीन’ ही संकल्पना पर्यावरण पूरक व आर्थिकदृष्ट्या लाभदायक असल्याने ती व्यापक प्रमाणावर स्वीकारली जावी, अशी अपेक्षा आहे.

पत्रकार -

Translate »